Pune: रामनदीचे प्रदूषण रोखण्यासाठी ग्रामस्थांचाच पुढाकार

पुणे – रामनदीचे प्रदूषण रोखण्यासाठी बावधन, भुकूम आणि भूगाव येथील ग्रामस्थांनी २० दिवसांत अडीच लाख रुपये जमा केले. यानंतर त्यांनी सांडपाण्याचे नऊ चेंबर्स दुरुस्त करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. राम नदीला पूर्वीचे वैभव मिळवून देण्याचा संकल्प या नागरिकांनी केला आहे.
राम नदीवर अतिक्रमण झाले आहे आणि उदासीनतेमुळे राडारोडा, कचरा आणि सांडपाणी नदीत सोडले जात आहे. या विषयी पर्यावरणप्रेमींनी अनेकदा आवाज उठवला आहे, आंदोलनेही केली आहेत. अॅड. कृणाल घारे, अनिल करंजवणे आणि गावकऱ्यांनी मे २०२३ मध्ये राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात (एनजीटी) खटला दाखल केला होता आणि तेव्हापासून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पुणे महापालिका आणि भूगाव आणि भुकुम या स्थानिक स्वराज्य संस्था यांनी विविध प्रतिज्ञापत्रे सादर केली आहेत.
हे प्रकरण पर्यावरण निरीक्षकाकडे प्रलंबित आहे. दरम्यान, गावकऱ्यांनी सांडपाण्याच्या लाइन आणि चेंबर्सची साफसफाई आणि दुरुस्ती करण्याची जबाबदारी घेतली आहे. “प्रत्यक्षात जागेवर काम २० मेपासून सुरू झाले असले, तरी नियोजन आणि संशोधन एक वर्षापूर्वी सुरू झाले.
योजना प्रभावीपणे अंमलात आणण्यासाठी आणि प्रकल्पाच्या खर्चाचा अंदाज घेण्यासाठी आम्ही सांडपाण्याच्या ठिकाणाचे जीपीएस मॅपिंग वापरले. रामनदीला पूर्वीचे वैभव परत मिळेल, याची आम्हाला खात्री आहे,’ असे अॅड. घारे म्हणाले.
तर, “आमच्या कार्यातून राम नदी स्वच्छता प्रकल्प गांभीर्याने हाती घेण्यास पुणे महापालिकेला प्रेरणा मिळेल. अशा योजनांसाठी नागरी संस्था निधीची तरतूद करत असली तरी बहुतांशी तो कागदावरच राहतो,’ असे करंजवणे म्हणाले. तिन्ही गावांत नदीकाठी १४ सांडपाणी चेंबर आहेत. उर्वरित चेंबर लवकरच दुरुस्त करण्याचा रहिवाशांचा विचार आहे.
“नदी स्वच्छ ठेवणे महत्त्वाचे असून, ग्रामस्थांचा उपक्रम स्तुत्य आहे. अशा कामासाठी लोकांच्या पाठिंब्याची गरज असते आणि नदी आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी ग्रामस्थांनी मदत केली. अशा उपक्रमांना प्रशासनाचा सदैव पाठिंबा राहील.” – प्रताप माने, ग्रामसेवक, भूगाव





