नवी दिल्ली : आम आदमी पक्षाने दिल्लीतील प्रदुषणाच्या मुद्यावरून पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचा खरपूस समाचार घेतला आहे. आपचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष सौरभ भारद्वाज यांनी सोशल मिडियावर एक व्हिडिओ जारी केला आहे. यानुसार, दिल्लीतील प्रदुषण वाढीला भाजप सरकारचा निष्काळजीपणा कारणीभूत आहे. दिल्लीतील टोल प्लाझावर उभ्या गाड्या आणि या गाड्यांतून निघणाऱ्या धुरामुळे हवा आणखी दुषित होत आहे. दिल्लीतील टोल प्लाझा प्रदूषणाचे केंद्र बनले आहेत, असा आरोपही त्यांनी सोशल मिडियावर केला आहे. दिल्लीत आणि महानगर पालिकेत भाजपची सत्ता आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीतील सर्व टोल प्लाझावर टोल वसूल करण्यास स्थगिती दिली आहे. तरीसुध्दा, भाजप सरकारने टोल नाके बंद केली नाही. याउलट, मोठ्या प्रमाणावर टोल टॅक्स वसूल केला जात आहे. यामुळे दिल्लीतील प्रदूषणाची परिस्थिती आणखी बिकट होत आहे. या टोल प्लाझांवर गाड्यांच्या लांब रांगा लागल्या आहेत, असा आरोप भारद्वाज यांनी केला आहे. एकीकडे, दिल्ली प्रदूषणाने ग्रासली आहे, तर दुसरीकडे, भाजपशासित एमसीडी या टोल प्लाझांकडून पैसे वसूल करण्यात व्यस्त आहे. दिल्लीतील प्रदूषणाची परिस्थिती सुधारेपर्यंत टोल प्लाझा मोफत करावेत. भाजपच्या नेतृत्वाखालील एमसीडीने अद्याप हे टोल प्लाझा मोफत केलेले नाहीत. भाजपला दिल्लीकरांच्या आरोग्याची नव्हे तर पैसे वसूल करण्यात जास्त रस आहे. भाजपला फक्त तिजोरी भरायची आहे, असेही ते म्हणाले.