Pune : स्वारगेट एसटी स्थानकावर खडा पहारा

पुणे : स्वारगेट एसटी स्थानकावर महिला मदत केंद्रासह आता प्रवासी महिलांच्या सुरक्षिततेसाठी महिला सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला या महिलांची नेमणूक करण्यात आली असून, त्या शुक्रवारी स्वारगेट स्थानकावर गस्त घालताना दिसल्या.
स्वारगेट स्थानकात घडलेल्या बलात्काराच्या दुर्दैवी घटनेनंतर एसटी स्थानकातील प्रवासी महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न समोर आला. या घटनेने एसटी प्रशासनही खडबडून जागे झाले आणि मोठ्या स्थानकावर महिलांच्या सुरक्षिततेसाठी महिला सुरक्षारक्षक नेमण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार स्वारगेट एसटी स्थानकात शुक्रवारी (दि. ७) सहा महिला सुरक्षारक्षक तैनात झाल्या आहेत.
महिला दिनाच्या पूर्वसंध्येला या महिला सुरक्षारक्षकांनी स्वारगेट स्थानकात गस्त घालून महिला प्रवाशांना अडीअडचणींबाबत विचारपूस केली. याशिवाय महिलांसाठी स्थानकातील कंट्रोल रूमजवळ सुरू केलेल्या महिला मदत केंद्रामध्ये एका महिलेची नेमणूक केली असून, या केंद्रामध्ये प्रवासी महिला आपल्या अडचणी, समस्या यासह तक्रारी मांडू शकतील.
पहिल्याच दिवशी दरारा
ये…काय रे इथं, कुठून आला, कुठे जायचे आहे, अशा कडक आवाजात महिला सुरक्षा रक्षक संशयित व्यक्तीकडे विचारणा करत होत्या. त्यांनी स्थानकावर विनाकारण फिरणाऱ्यांना बाहेर काढले. महिला प्रवाशांची विचारपूस करत त्यांना आश्वस्त केले. त्यामुळे दिवसभर स्थानकावर महिला सुरक्षकांचा दरारा दिसून आला. हाच दरारा कायम राहावा आणि महिला प्रवाशांची काळजी घ्यावी, अशा भावना महिला प्रवाशांनी व्यक्त केल्या.
पुणे विभागातील मोठ्या एसटी स्थानकावर महिला सुरक्षारक्षक नेमण्यात येणार असून, त्याबाबत प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्यानुसार स्वारगेट एसटी स्थानकात सहा महिला सुरक्षारक्षक आजपासून हजर झाले असून, शिवाजीनगर आणि बारामती येथील स्थानकांतही महिला सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यात येणार आहे.
– प्रमोद नेहुल – विभागीय नियंत्रक, पुणे एसटी





