पुणे | लोहगड किल्ला परिसरात जनजागृतीसाठी विविध कार्यक्रम

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – ‘युनेस्को’ कडे प्रस्तावित जागतिक वारसा नामांकनासाठी लोहगड किल्ल्याची निवड झाल्याबद्दल श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ संचलित लोहगड विसापूर विकास मंचाच्या वतीने जनजागृतीसाठी आज लोहगड किल्ल्यावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी केंद्रीय आणि राज्य पुरातत्व विभागाचे मार्गदर्शन लाभले होते.
सकाळी ९ वा. कार्ला फाटा ते लोहगड पायथा भव्य दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. भगव्या झेंड्यांनी सुसज्ज दुचाकींमुळे मार्गावर सर्वत्र शिवमय वातावरण निर्माण झाले होते.
लोहगड येथील शिवस्मारकावर सकाळी १०.३० वा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला आणि शिववंदनेने महाराजांना अभिवादन करण्यात आले.
शिवसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवव्याख्याते धनंजय चंद्रात्रे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य कसे उभे केले या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.
महाराजांनी लढलेल्या विविध लढाया आणि त्यांचे माहात्म्य यावेळी त्यांनी अभ्यासपूर्वक मांडले. शिवरायांच्या मावळ्यांनी प्राणाची बाजी लावून हे गडकोट किल्ले उभे केले त्याच्यावर हिंदवी स्वराज्य उभे राहिले असे हे ऐतिहासिक वैभव जतन करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले.
यावेळी पुरातत्व विभागाचे अधिकारी गजानन मांडवरे, सहाय्यक गटविकास अधिकारी थोरात साहेब, गणेश धानिवले, सरपंच सोनाली बैकर, पोपट दिघे, रमेश बैकर, सुभाष हुलावळे, सचिन भोरडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन मंचाचे अध्यक्ष विश्वास दौंडकर, संदीप गाडे, सचिन निंबाळकर आदींनी केले.




