पुणे : व्हॅलेंटाईन फिव्हर ; ‘आय लव्ह यू’ म्हणत ‘त्याने’ हातावर मारला सूरा अन्…

पुणे – एका महाविद्यालयीन तरुणीच्या प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाने तिला ‘आय लव्ह यू’ म्हणत स्वत:च्या हातावर सुरी मारुन घेतली. ही घटना येरवडा येथील मेंटल कॉर्नर बस थांब्यावर घडली. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात ईस्माईल रियाज शेख (21,रा.राजीव गांधी नगर येरवडा) याला येरवडा पोलिसांनी अटक केली आहे.
याप्रकरणी एका 18 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. त्यानूसार विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार फिर्यादी तरुणी व आरोपी तरुण एकाच परिसरात रहातात. तरुणी महाविद्यालयात शिक्षण घेते, तर आरोपी काहीही कामधंदा करत नाही. तो अंमली पदार्थाच्या व्यसनांच्या आहारी गेला आहे. तो नेहमी तरुणीचा पाठलाग करुन तीला त्रास देत असतो.
गुरुवारी सकाळी तरुणी महाविद्यालयात जाण्यासाठी बस थांब्यावर थांबली होती. यावेळी आरोपी ईस्माईलने तीला आय लव्ह यू म्हटले, मात्र तीने काहीच प्रतिसाद न दिल्याने त्याने हातावर सूरा मारुन घेतला. या घटनेत त्याला किरकोळ जखम झाली आहे. याप्रकरणाचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक ठाकूर करत आहेत.





