पुणे :देहविक्रय करणाऱ्या महिलांचे लसीकरण सुरू

करोना प्रतिबंध ः महापालिकेने राबवली दोन दिवस मोहीम
पुणे – कायमच दुर्लक्षित असलेल्या वेश्या वस्तीतील देहविक्रय करणाऱ्या महिलांचे करोना प्रतिबंधक लसीकरण सुरू झाले असून, “वंचित विकास संस्थे’ने यामध्ये पुढाकार घेतला आहे.
सुरक्षेविषयक उपाययोजना आणि लॉकडाऊन या परिस्थितीमुळे सध्या वेश्याव्यवसाय जवळपास बंदच आहे. व्यवसाय होत नसल्यामुळे या महिलांच्या उपजीविकेचा प्रश्नही निर्माण झाला आहे. त्याहीपेक्षा या महिलांचे करोना प्रतिबंधक लसीकरण होणे अधिक महत्त्वाचे होते. जेणेकरून तेथे करोनाचे संक्रमण होऊ नये.
या महिलांच्या लसीकरणामध्ये “वंचित विकास संस्थे’ने पुढाकार घेतला असून, या महिलांच्या लसीकरणाची व्यवस्था करण्यासंदर्भात त्यांनी महापालिकेकडे पाठपुरावा केला. त्यावर महापालिकेने दाणे आळीतील कार्यालयात लसीकरणाची व्यवस्था करून दिली. दोन दिवस ही मोहीम सुरू होती. यामध्ये तृतियपंथीयांनाही लस देण्यात आली आहे.
सध्या 18 ते 44 वर्षे वयोगटासाठी हे लसीकरण सुरू आहे. केवळ या महिलाच नव्हे, तर त्यांच्या नवऱ्यांनाही लस दिली जात आहे. याशिवाय एड्सग्रस्त आणि गंभीर आजार असलेल्या महिलांना प्राध्यान्य दिले असून, त्यांचे लसीकरण रविवारीच करण्यात आले आहे.
लसीकरणासंदर्भात अनेक गैरसमज या महिलांमध्ये होते. ते दूर करण्याचे काम “वंचित’च्या स्वयंसेवकांनी केले, त्यामुळे मोठ्या संख्येने लसीकरण झाले. लसीच्या तुटवड्यामुळे सध्या महापालिकेने दोनच दिवस दिले आहे. परंतु अधिक लस उपलब्ध झाल्यास आणखी मोहीम येथे घेण्यात येणार आहे. याशिवाय येथील महिलांच्या मुलांसाठीही लसीकरण सुरू आहे. त्यासाठी गाडीखान्याशी टायअप असून, तेथून लसीकरणाची गाडी या भागात येते आणि मुलांना लस देते. तसेच पोलिओ लसीकरणाचेही विशेष मोहीम या ठिकाणी घेतली जाते.
– मीनाक्षी नवले, वंचित विकास संस्था





