Pune : यूपीएससी परीक्षार्थींची कागदपत्रे ऑनलाइनच द्यावी लागणार

पुणे : केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून (यूपीएससी) घेतल्या जाणाऱ्या नागरी सेवा परीक्षांसाठी आता ऑनलाइन अर्ज करतानाच वय, जात प्रमाणपत्र आणि शारीरिक दिव्यांगत्व प्रमाणपत्र यासारखी कागदपत्रे ऑनलाइन सादर करणे अनिवार्य केले आहे. यापूर्वी यूपीएससीची पूर्व परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरच उमेदवारांना ही कागदपत्रे अपलोड करावी लागत होती. आता मात्र यूपीएससीने पूर्व परीक्षेच्या स्तरावर सर्व कागदपत्रे सादर करणे बंधनकारक केले आहे.
यूपीएससीने नुकतीच अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. यूपीएससीच्या निवडीसाठी पूर्व परीक्षा, मुख्य लेखी परीक्षा आणि मुलाखत असे तीन टप्प्पे असतात. यूपीएससीच्या परीक्षेला देशभरातून लाखो उमेदवार बसतात. यातून पूर्व परीक्षेतून मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना वय, जात प्रमाणपत्रसह अन्य कागदपत्रे सादर करावी लागत असत. आता मात्र पूर्व परीक्षेच्या दरम्यान सर्व कागदपत्रे सादर अनिवार्य करण्यात आले आहे.
काही महिन्यांपूर्वी पुण्यात यूपीएससी प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर यांनी चुकीच्या पद्धतीने ओबीसी आणि दिव्यांगत्व कोट्याचा लाभ घेतल्याचा आरोप झाल्यानंतर देशभर मोठा वाद निर्माण झाला होता. या घटनेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
…तर उमेदवारी रद्द
यूपीएससी परीक्षांसाठी अर्ज करण्यास इच्छुकांना ऑनलाइन अर्ज करणे अनिवार्य आहे. या ऑनलाइन अर्जासोबतच जन्मतारीख, आरक्षणाचा प्रवर्ग, यासह अन्य आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. या अर्जासोबत कागदपत्रे सादर न करू शकणाऱ्या अर्जदारांची उमेदवारी रद्द करण्यात येईल, असे यूपीएससीने म्हटले आहे.





