प्रभात वृत्तसेवा पुणे – विद्यार्थ्यांचे हित, अध्यापनातील गुणवत्ता, संशोधनास चालना आणि उच्च शिक्षणाचा सर्वांगीण विकास, यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा सिनेट सदस्य म्हणून कार्यरत राहीन, अशी ग्वाही आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी बुधवारी दिली.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी यांनी पुणे विद्यापीठाचे राज्यपाल नियुक्त सिनेट सदस्य म्हणून नेमणूक झाल्याबद्दल आमदार शिरोळे यांचा विशेष सत्कार केला आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. शिरोळे यांची सिनेट सदस्य म्हणून झालेली नेमणूक ही विद्यापीठासाठी अभिमानाची बाब आहे. त्यांच्या अनुभवातून आणि दूरदृष्टीतून विद्यापीठाच्या शैक्षणिक, संशोधन आणि विकासात्मक कामकाजाला निश्चितच नवी दिशा मिळेल, असे डॉ. गोसावी म्हणाले.शिरोळे यांनी कुलगुरूंचे आभार मानले. सिनेट सदस्य या नात्याने विद्यापीठातील शैक्षणिक, प्रशासकीय आणि विकासात्मक कामकाजामध्ये माझे सक्रीय योगदान राहील, असे आश्वासन त्यांनी दिले. या कार्यक्रमाला विद्यापीठातील सिनेट सदस्य, प्राध्यापक, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.