Pune : विद्यापीठाच्या परीक्षा २५ मार्चपासून

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रातील पदविका, पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा दि. २५ मार्चपासून सुरु करण्यात येत आहेत. या अभ्यासक्रमांच्या परीक्षांची वेळापत्रके टप्प्याटप्प्याने प्रसिद्ध करण्यात येत आहेत. या परीक्षेसाठी सर्व व्यवस्था करण्याचे निर्देश विद्यापीठाने सर्व संलग्नित महाविद्यालयांना दिले आहेत.
पदविका अभ्यासक्रमांच्या परीक्षा आणि कला, वाणिज्य व विज्ञान या पदवीस्तरावरील प्रथम वर्षाच्या परीक्षा, विधी अभ्यासक्रम पदवीस्तरावरील प्रथम वर्षाच्या परीक्षेचे आयोजन महाविद्यालयस्तरावर करण्यात येणार आहे. याचे वेळापत्रक, प्रश्नपत्रिका तयार करणे, प्रत्यक्ष परीक्षांचे आयोजन करणे, उत्तरपत्रिका तपासणे, अंतर्गत गुण भरण्याची सर्व कामे महाविद्यालयस्तरावर करण्यात यावे, असेही पुणे विद्यापीठाने म्हटले आहे. तसेच, अन्य अभ्यासक्रमांच्या उर्वरित परीक्षा पुणे विद्यापीठास्तरावरुन होणार आहेत.
विद्यार्थ्यांनी परीक्षा सुरु होण्यापूर्वी अर्धा तास अगोदर परीक्षा केंद्रावर हजर राहणे अनिवार्य आहे. केंद्रीय मूल्यमापन प्रकल्प केंद्र, अर्थात कॅप परीक्षा सुरु झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी सुरु करावेत. परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, काही कारणांमुळे विद्यार्थ्यांचे उत्तरपत्रिका बारकोड संबंधित परीक्षा केंद्रास प्राप्त झालेली नसतील, तर त्यांना इमर्जन्सी बारकोड देऊन परीक्षा देण्याची व्यवस्था करावी. परीक्षा अर्ज न भरलेल्या विद्यार्थ्यांना इर्मजन्सी बारकोडवरुन परीक्षेस बसविणे हा दखलपात्र गुन्हा असून, त्याबाबत संबंधितावर कारवाई होऊ शकते, असेही परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डाॅ. प्रभाकर देसाई यांनी सांगितले आहे.
अभ्यासक्रमाचे वेळापत्रक संकेतस्थळावर
सर्व पदविका अभ्यासक्रम व बीए, बीकाॅम व बीएसस्सी या पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा २५ मार्चपासून सुरु होणार आहेत. विधी अभ्यासक्रम आणि बीबीए अभ्यासक्रमाची पदवीस्तरावरील परीक्षा ९ एप्रिलपासून सुरु होणार आहेत. या अभ्यासक्रमाचे वेळापत्रक विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. अन्य अभ्यासक्रमाच्या परीक्षा लवकरच प्रसिद्ध केले जाणार आहेत.




