Pune : महागाईवरून अनेक ठिकाणी अस्वस्थता

पुणे : महागाईच्या संदर्भात महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अस्वस्थता पाहायला मिळत आहे. महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचारही वाढत चालला आहे. याबाबत मी केंद्र सरकारला पत्र लिहिणार आहे. ग्लोबली ऑइलच्या किमती कमी झाल्या आहेत. मग भारतात पेट्रोल- डिझेल, तसेच गॅसच्या किमती कमी व्हायला पाहिजेत, असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. त्या महात्मा फुले वाड्यातील समताभूमीत अभिवादनासाठी आल्या होत्या.
महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित प्रदर्शित होणाऱ्या फुले चित्रपटाला विरोध होताना पाहायला मिळत आहे. यावर बोलताना खासदार सुळे म्हणाल्या, की मला या सिनेमाबाबत पुष्कळ माहिती नाही. नेते शरद पवार मुख्यमंत्री असताना महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित ज्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले होते, ते पुस्तक आज पुन्हा काढण्यात आले आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून म. फुले यांचे विचार सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे, असे खा. सुळे म्हणाल्या.
महिलांवर अत्याचाराच्या घटना या वाढल्या आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मागणी करत आहे, की राजकारण बाजूला ठेवत राज्याच्या हिताच्यासाठी एकत्र येत काही केले पाहिजे. मी गृहमंत्र्यांना तशी विनंती केली आहे. त्यांनी यासाठी पक्षांची बैठक बोलवावी. राजकारण बाजूला ठेवून यावर समाज म्हणून आपण चर्चा केली पाहिजे, असे खा. सुळे म्हणाल्या.
खा. सुळे आणखी काय म्हणाल्या….
– बनेश्वरच्या रस्ता हा विषय राजकीय नाही. सकारात्मक भूमिका घेतल्याने सरकारचे आभार मानते.
– एसटी कर्मचाऱ्यांबाबत सरकारला विनंती आहे, की गरीब कष्टकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे.
– महाराष्ट्राच्या पिक विम्याबद्दल काय झाले, हा प्रश्न सुरेश धस आणि संदीप क्षीरसागर यांना विचारा.
– महाराष्ट्राची सामाजिक चळवळ व भारताला वेगळी दिशा देण्याचे कार्य महात्मा फुले आणि सावित्रीबाई यांनी केले.





