पुणे: कारवाईनंतर जॅमरसह दुचाकी चालकाचे पलायन

पुणे : रस्त्याने विरूध्द दिशेने दुचाकी घेवून येणार्यास वाहतुक पोलिसांनी अडविले. तसेच त्याच्या दुचाकीस जॅमर लावून कारवाई केली. मात्र, पोलिसांची नजर चुकवून चालकाने जॅमरसह दुचाकी घेत धूम ठोकल्याचा प्रकार उघडकीस आला. शिवाजी रस्त्यावर गोटीराम भैय्या चौकात रविवारी रात्रीच्यावेळी हा प्रकार घडला.
पोलीस अमलदार रवि जाधव यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चालकाविरोधात खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी हे खडक वाहतुक विभागात कार्यरत आहेत. रविवारी सायंकाळी दुचाकी चालक विरूध्द दिशेेने वाहन घेवून येत असताना त्यांना दिसला.
फिर्यादींनी त्याला अडवून विचारणा केली असता त्याने मद्यसेवन केले होते तसेच तो वाहन चालविण्याच्या परिस्थितीत नसल्यामुळे त्याच्या वाहनास जॅमर लावत कारवाई केली. मात्र, त्यानंतर काही तासांनी सदर ठिकाणी पाहणी केली.
तेव्हा पोलिसांची नजर चुकवून अज्ञात चालकाने जॅमरसह त्याची दुचाकी घेवून गेल्याचे दिसून आले. हा प्रकार लक्षात येताच आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास खडक पोलीस करीत आहेत.





