pune : पुण्यात आणखी दोन मेट्रो मार्गांना मान्यता

लोणीकाळभोर, सासवड रोड रेल्वे स्थानकापर्यंत धावणार मेट्रो
मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मान्यता
पुणे – शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी शासनाकडून पुण्यात आणखी दोन मेट्रोच्या उपमार्गांना मान्यता देण्यात आली आहे. पुणे मेट्रो टप्पा-२ खडकवासला-स्वारगेट-हडपसर-खराडी मेट्रो मार्गिकेअंतर्गत हडपसर ते लोणी काळभोर आणि हडपसर बस डेपो ते सासवड रोड या दोन उपमार्गांना आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या मंत्रीमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून या मार्गांच्या मान्यतेसाठी पुढाकार घेतला होता. महापालिकेकडून काही महिन्यांपूर्वी या प्रकल्पास मान्यता देत शासनाकडे हा प्रस्ताव पाठविला होता, त्यानुसार या प्रकल्पाचा सर्व खर्च महामेट्रो आणि शासनाकडून केला जाणार आहे.
असा आहे प्रकल्प…
पीएमआरडीएकडून मेट्रो-३ अंतर्गत हिंजवडी ते शिवाजीनगर मार्ग साकारला जात आहे. हा मार्ग पुढे हडपसरपर्यंत असणार आहे. त्या सोबतच आता मेट्रो-२ मध्ये खडकवासला-स्वारगेट-हडपसर-खराडी मेट्रो मार्गिकाही असणार आहे. या दोन्ही मार्गांवरून प्रवाशांना पुढे या दोन उपमार्गांना जाता येणार आहे.
हडपसर ते लोणी काळभोर आणि हडपसर बसडेपो ते सासवड रोड या दोन उपमार्गिका एकूण १६ कि.मी. लांबीच्या असून त्यामध्ये एकूण १४ उन्नत स्थानकांचा समावेश असेल. या दोन्ही उपमार्गिकांसाठी ५ हजार ७०४ कोटी रुपये खर्च येणार असून या पूर्णतः उन्नत मेट्रो प्रकल्पांची महा मेट्रोमार्फत अंमलबजावणी करण्यास आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
या दोन्ही प्रकल्पांमुळे पुणे शहरातील वाहतूक कोंडीपासून नागरिकांना दिलासा मिळणार आहे. या प्रकल्पामुळे पुणे मेट्रोचे जाळे पूर्वेकडे विस्तारित होणार असून पूर्व पुणे आणि परिसरातील ग्रामीण भागालाही मेट्रो सेवेचा मिळणार असून या दोन उपमार्गिकांमुळे हडपसर, फुरसुंगी, लोणी काळभोर आणि सासवड रसस्त्याच्या बाजूला विस्तारत असलेल्या वाढत्या उपनगरांना मेट्रो जोडणी मिळेल.





