पुणे :तटरक्षक दलाच्या ताफ्यात आणखी दोन नौका!

स्वदेशी पद्धतीची रचना असलेली जहाजे विविध सुविधांनी सज्ज
पुणे – समुद्रातील प्रदूषणावर लक्ष ठेवणे, तेल गळतीवरील निरीक्षण आणि प्रतिसाद देणे अशा कार्यांसाठी भारतीय तटरक्षक दलाच्या ताफ्यात आणखी दोन नौका दाखल होणार आहेत. स्वदेशी पद्धतीची रचना असलेली ही विशेष जहाजे विविध सुविधांनी सज्ज असणार आहेत, अशी माहिती संरक्षण मंत्रालयातर्फे देण्यात आली.
सध्या, भारतीय तटरक्षक दलाच्या ताफ्यात मुंबई, विशाखापट्टणम् आणि पोरबंदर येथे प्रदूषणावर लक्ष ठेवणे, तेल गळतीवरील निरीक्षण आणि प्रतिसाद कार्यपद्धती यासाठी भारताच्या समुद्रातील आर्थिक क्षेत्र आणि आसपासच्या बेटांवर तीन प्रदूषण नियंत्रक जहाजे तैनात आहेत.
नवीन नियोजित प्रदूषण नियंत्रक जहाजे ही पूर्वेकडील आणि पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या अंदमान आणि निकोबार विभागातील आवश्यकतांच्या पूर्ततेसाठी तैनात असणार आहेत.
या जहाजांत हेलिकॉप्टर वापर क्षमतेसह अनेक अत्याधुनिक वैशिष्ट्ये असतील, ज्यामध्ये कानाकोपऱ्यात जाऊन काम करणाऱ्या सूक्ष्म तांत्रिक उपकरणांचा समावेश असेल. तसेच जहाजातून गळती होणारे तेल गोळा करणे आणि पसरणारे तेल नष्ट करण्याची क्षमतादेखील या जहाजांमध्ये असेल.
स्वदेशी जहाज बांधणीची क्षमता वाढणार
नुकतेच यासंदर्भात संरक्षण मंत्रालय आणि गोवा शिपयार्ड लिमिटेड (जीएसएल) यांच्यात 583 कोटी रकमेच्या दोन प्रदूषण नियंत्रक जहाजांच्या बांधकामासंदर्भात करार झाला आहे.
स्वदेशी पद्धतीची रचना असलेली ही विशेष जहाजे गोवा शिपयार्ड लिमिटेडच्या वतीने विकसित केली जातील. या करारामुळे स्वदेशी जहाज बांधणीची क्षमता वाढेल आणि जहाज बांधणी क्षेत्रात सुमारे 200 सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगातील विक्रेत्यांना रोजगार उपलब्ध होईल, असा विश्वास मंत्रालयातर्फे व्यक्त करण्यात आला आहे.





