पुणे : खंडणी मागणाऱ्या दोघांना मोक्का कोठडी

पुणे : काम करायचे असेल, तर आम्हाला दर महिन्याला दहा हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगत इंटरनेट सेवा देणाऱ्या व्यावसायिकाला खंडणी मागणाऱ्या दोघांना विशेष न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी मोक्का कोठडी सुनावली.
अतुल धोत्रे (२१, रा. ३६३/२, वडारवाडी कुसाळकर बिल्डिंग ) आणि तेजस विटकर (२१, भाभा हॉस्पिटल मागे, वडारवाडी ) अशी मोक्का कोठडी सुनावण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी फिर्यादी निखिल भोरडे यांचा इंटरनेट सेवा देण्याचा व्यवसाय आहे.
वडारवाडी येथील एका कॉम्प्लेक्समध्ये फिर्यादी यांचे कामगार इंटरनेटचे फायबर टाकत असताना आरोपी निखिल व अतुल यांनी धमकी देत त्यांचे काम थांबविले आणि फिर्यादी यांच्याकडे खंडणी मागितली.
तडजोडी अंती फिर्यादी यांच्याकडून ४००० रुपये शुल्क स्वीकारले. याप्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, ३१ ऑक्टोबर ला न्यायालयाने आरोपींना जामीन मंजूर केला होता. मात्र, त्यात मोक्का कलमाचा समावेश करण्यात आला. त्यामुळे आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. अधिक तपासासाठी विशेष सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी आरोपींच्या कोठडीची मागणी केली होती.





