Pune : दोन शहराध्यक्ष आणि दोन कार्याध्यक्ष; राष्ट्रवादी काँग्रेसकडून सोयीसाठी पुण्याचे दोन भाग

पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेसची पुण्याची कमान आता दोन शहराध्यक्ष आणि दोन कार्याध्यक्षांच्या हाती सोपवण्यात आली आहे. त्यामुळे आता पुण्याचे दोन भाग करून हे शहराध्यक्ष स्वतंत्रपणे आपापला कार्यभार सांभाळणार आहेत.
बनावट कागदपत्रे बनवल्याप्रकरणी दीपक मानकर यांनी शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर पक्षाने शहराचे पूर्व आणि पश्चिम असे भाग करून दोन जणांकडे शहराची जबाबदारी सोपविली आहे.
शहराचे मतदारसंघ निहाय भाग करण्यात आले आहेत. त्यात शहराचा पूर्व भाग म्हणजे कसबा, कॅन्टोन्मेंट, हडपसर आणि वडगाव शेरी आणि पर्वती, खडकवासला, कोथरूड आणि शिवाजीनगर हा पश्चिम भाग असे ठरवण्यात आले आहे. पूर्व भागातील चार मतदारसंघांसाठी माजी आमदार सुनील टिंगरे यांना शहराध्यक्ष केले असून, कार्याध्यक्ष म्हणून रुपाली पाटील- ठोंबरे यांना, तर दुसरे कार्याध्यक्ष म्हणून हाजी फिरोज शेख यांची निवड करण्यात आली आहे.
पश्चिम भागातील चार मतदारसंघांसाठी शहराध्यक्षपदी सुभाष जगताप यांची, तर कार्याध्यक्षपदी प्रदीप देशमुख यांची फेरनिवड करण्यात आली आहे. दुसरे कार्याध्यक्ष म्हणून अक्रुर कुदळे यांची निवड करण्यात आली आहे.
ही निवडीची घोषणा पक्षाचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली असून, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी त्यांना नियुक्तीपत्रे दिली आहेत.





