Pune : आषाढी वारीतील दिंड्यांना वीस हजार रुपये अनुदान

पुणे : आषाढी एकादशी यात्रा २०२५ साठी मानाच्या १० पालख्यांसोबतच्या १ हजार १०९ दिंड्यांना प्रती दिंडी २० हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय शनिवारी घेण्यात आला. त्याबाबतचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला आहे. त्यामुळे दिंडीतील वारकऱ्यांसाठी आणखी सुविधा उपलब्ध होतील.
गतवर्षी आषाढी एकादशी यात्रेतील मानाच्या १० पालख्यांसोबत येणाऱ्या प्रत्येक दिंडीला २० हजार रुपये अनुदान सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत देण्यास प्रशासकीय मान्यता दिली होती.
त्यानुसार २०२३-२४ मध्ये पुण्याच्या विभागीय आयुक्तांना एकूण १ हजार १०९ दिंड्यांची यादी प्राप्त झाली. यावर्षीदेखील दिंड्यांना प्रतिदिंडी २० हजार रुपये याप्रमाणे एकूण २ कोटी २१ लाख ८० हजार अनुदान वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत बैठक घेऊन पालखी सोहळ्यासाठी वारकऱ्यांना उत्तम सुविधा देण्याचे निर्देश दिले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही आवश्यक सुविधांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाही दिली आहे.




