पुणे : विद्यापीठ चौकात ‘ट्रायल रन’

पुणे- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या चौकातील नियोजित उड्डाणपुलाचे काम लवकरच सुरू होणार आहे. या चौकात होणारी वाहतूक कोंडी आणि पुलाचे काम सुरू झाल्यानंतरची संभाव्य स्थिती लक्षात घेत वाहतूक पोलिसांनी आतापासून वाहतुकीच्या पर्यायी मार्गांची “ट्रायल रन’ गुरुवारपासून सुरू केले. नियोजित मार्गांवर फलक आणि बॅरिकेडस लावले आहे. पण वाहनचालक काहीसे संभ्रमात पडत आहेत. मात्र या “ट्रायल रन’मुळे कोंडी फुटण्याची आशा व्यक्त करण्यात येत आहे.
वाहतूक वळवली आहे…
गुरूवारपासून झालेल्या वाहतूक बदलाबाबत अनेक वाहनचालक अनभिज्ञ होते. त्यामुळे सवयीनुसार वाहनचालक ये-जा करत होते. गुरूवारी बदललेल्या वाहतूक मार्गावर विविध चौकांमध्ये वाहतूक शाखेचे कर्मचारी आणि ट्रॅफिक वॉर्डनची नेमणूक करण्यात आली आहे. यामुळे आता “नो-एन्ट्री’ असणाऱ्या मार्गावर ये-जा करू इच्छिणाऱ्या वाहनचालकांना वाहतूक वळवली असल्याचे कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येत होते. मात्र काही ठिकाणी “थोड्याच अंतरावर जायचे आहे’, असे सांगत सवलत देण्याची मागणी काही वाहनचालकांकडून करण्यात येत होती.





