Pune : वाहतूक शाखेचे नियोजन कोलमडले; पालखी सोहळ्यासाठी जागोजागी रस्ते बंद

पुणे – पालखी सोहळ्यात भाविकांची होणारी गर्दी विचारात घेऊन वाहतूक पोलिसांनी शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल केला. शहरात बाहेरगावाहून येणाऱ्या वाहनांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहनही करण्यात आले होते. मात्र, शहरात पालखीचे आगमन होण्यापूर्वीच ठिकठिकाणी बॅरिकेडस आणि बांबू लावून रस्ते बंद करण्यात आले. त्यामुळे शहराच्या मध्यवर्ती परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.
रेंजहिल चौक ते संचेती चौक (गणेशखिंड रस्ता), डेक्कन जिमखाना येथील खंडोजीबाबा चौक ते वीर चापेकर चौक (नामदार गोपाळकृष्ण गोखले रस्ता- फर्गसन रस्ता), गाडगीळ पुतळा चौक ते स. गो. बर्वे चौक (छत्रपती शिवाजी रस्ता), आपटे रस्ता, नामदार गोपाळकृष्ण गोखले रस्ता ते टिळक रस्ता, लक्ष्मी रस्ता (टिळक चौक ते संत कबीर चौक), शनिपार चौक ते सेवासदन चौक, नेहरू चौक ते सोन्या मारुती चौक, गणेश रस्त्यावरील देवजीबाबा चौक ते हमजेखान चौक.
नेहरू रस्त्यावरील रामोशी गेट ते पालखी विठोबा मंदिर, संत कबीर चौक ते चाचा हलवाई चौक हे मार्ग वाहतुकीसाठी बंद होते. याचा परिणाम प्रचंड वाहतूक कोंडी होण्यावर झाला होता. नागरिकांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत होता. त्यातच वारीतील हजारो ट्रक आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी सकाळीच दाखल झाले होते. त्यामुळे गल्ली बोळातील वाहतुकीसही अडथळा निर्माण झाला होता.
वाहतूक अधिकाऱ्यांकडून तत्परता नाही
पालखी सोहळा मुक्कामी आल्यानंतर नाना आणि भवानी पेठेतील रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय वाहतूक शाखेने घेतला होता. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर , शनिवारवाडा परिसरात वारकरी गर्दी करत असल्याने शुक्रवार ते रविवारी सकाळी अकरापर्यंत शिवाजी रस्ता आणि लक्ष्मी रस्ता (संत कबीर चौक ते बेलमाग चौक) वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला गेला.
याचा परिणाम मात्र उलटा झाला. वाहनचालकांनी गल्ली बोळातून वाहने घालत शहरातील मध्यवर्ती भागच जाम करून टाकला. वाहतूक कोंडी लक्षात घेऊन बंद केलेले रस्ते खुले करून वाहनांना मार्ग करून देणे आवश्यक होते. मात्र, कर्तव्यावरील वाहतूक अधिकाऱ्यांनी कोणतीही तत्परता दाखवली नाही. त्यामुळे नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त होत होता. दरम्यान, समाज माध्यमातून मोठ्या प्रमाणात टीका झाल्यावर सायंकाळी चार वाजता बंद केलेले रस्ते खुले करण्यात आले. त्यामुळे खोळंबलेली वाहतूक खुली झाल्याचे पाहायला मिळाले.





