पुणे : पुणे जिल्हा परिषदेने यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून ‘पुणे मॉडेल स्कूल’ उपक्रमाची सुरुवात केली आहे. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एक केंद्र याप्रमाणे ३०३ शाळा आदर्श मॉडेल स्कूल म्हणून विकसित केली जाणार आहे. जर्मन आणि फ्रेंचसारख्या परकीय भाषांसह शिक्षण देण्याबरोबरच ३०३ शाळांमध्ये अद्ययावत भौतिक सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांचा कायपालट होणार असल्याची चिन्हे आहेत. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांचा सर्वांगीण विकास करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे, अशी माहिती झेडपीचे सीईओ गजानन पाटील यांनी दिली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. या उपक्रमामध्ये भौतिक सुविधा अंतर्गत शाळा दुरुस्ती, सुसज्य वर्गखोल्या, संगणक लॅब, आधुनिक ग्रंथालय, स्वच्छतागृह, संरक्षण भिंत, सौरउर्जा प्रकल्प, डिजिटल बोर्ड या सुविधांमुळे विद्यार्थ्यांना अद्ययावत आणि प्रेरणादायी शिक्षण मिळण्यास मदत होणार आहे. पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान यावर विशेष भर दिला जाणार आहे. सामान्य ज्ञान परीक्षा आणि इस्त्रो भेट, शिक्षकांना दर्जेदार प्रशिक्षण, व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये जशा सुविधा असतात, त्याप्रमाणे सर्व सुविधा जिल्हा परिषेदच्या शाळांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती गजानन पाटील यांनी सांगितले. शुभारंभ शनिवारी पुणे जिल्हा परिषदेचा महत्त्वाकांक्षी पुणे माॅडेल स्कूल या उपक्रमाचा शुभारंभ येत्या शनिवारी (दि. १४) स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा रंग मंच येथे उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी जिल्ह्यातील हजारो शिक्षक उपस्थित राहणार आहेत. पुणे मॉडेल स्कूल उपक्रमामुळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळांचा भौतिक व शैक्षणिक गुणवत्तेबाबत कायापालट होणार आहे. शालेय शिक्षणामध्ये तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर वाढेल आणि सीएसआरच्या माध्यमातून दर्जेदार सुविधा उपलब्ध होणार आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जिल्हा परिषदेतील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मोफत आणि दर्जेदार शिक्षण उपलब्ध होणार आहे – गजानन पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद पुणे