Pune : समन्वयातूनच परिवर्तन आणि शाश्वत विकास – नारायण राणे

पुणे -एकविसाव्या शतकात शहरीकरण विकासाच्या केंद्रस्थानी आले आहे. त्यासाठी पायाभूत सुविधा, संरचना यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. 2045 पर्यंत शहरातील लोकसंख्या लक्षणीयरित्या वाढणार आहे. पुढील दोन दशकांमध्ये शहरांचा अधिकाधिक विस्तार होणार आहे. त्यादृष्टीने गुंतवणूकही वाढवावी लागणार आहे. त्यादृष्टीने अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय संस्थांचे परस्पर संबंध महत्वाचे ठरणार आहे. सार्वजनिक, शासकीय आणि खासगी क्षेत्रांनी हातात हात घेऊन काम केल्यास परिवर्तन आणि शाश्वत विकास घडू शकेल, असे प्रतिपादन देशाचे सूक्ष्म
आणि लघु उद्योगमंत्री नारायण राणे यांनी सोमवारी केले. पुण्यातील जी-20 परिषदेचे उद्घाटन राणे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्यांनी विविध देशांमधील प्रतिनिधींशी संवाद साधताना शाश्वत विकास, पर्यावरणाचे महत्त्व, परस्पर आंतरराष्ट्रीय संबंध आदी महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित केले. “वसुधैव कुटुंबकम’ हे यंदाच्या जी-20 परिषदेचे ब्रीदवाक्य आहे. दीर्घकालीन आर्थिक विकासासाठी यानिमित्ताने प्रोत्साहन मिळत आहे. जगाच्या सामाजिक, आर्थिक उन्नतीसह परस्पर आंतरराष्ट्रीय संबंध यानिमित्ताने दृढ होणार आहेत. पुणे शहर हे शक्तिशाली मराठा साम्राज्याचे सत्ताकेंद्र होते. भारताच्या इतिहासात या शहराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आगाखान पॅलेस, शनिवारवाडा अशा ऐतिहासिक स्थळांमुळे पुण्याच्या वैभवात भर पडली आहे. पुण्याला सांस्कृतिक, शैक्षणिक, औद्योगिक आणि ऐतिहासिक वारसा लाभला आहे. पुणे हे कला आणि शिक्षणाचे माहेरघर असून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वाचे आर्थिक, औद्योगिक केंद्र आहे, अशा शब्दांत राणे यांनी पुण्याची ओळख करून दिली.
पर्यावरण’ केंद्रस्थानी
प्राकृतिक वर्चस्ववाद आणि स्वामित्व हक्क गाजवण्याच्या स्पर्धेमुळे जागतिक स्तरावर संघर्ष निर्माण होत आहे. त्यामुळे पर्यावरणाला मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झाला आहे. म्हणूनच, यंदाच्या जी-20 परिषदेमध्ये पर्यावरणाला केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे. पर्यावरणपूरक जीवनशैली हे अभियान भारताने हाती घेतला आहे. यातूनच पर्यावरण संवर्धनाला गती मिळू शकेल. परिषदेत यातील आव्हाने आणि उपाययोजनांवर चर्चा होईल, अशी अपेक्षा आहे.





