Pune : राज्यातील ७०१ केंद्रांवरील केंद्रसंचालक, पर्यवेक्षकांची अदलाबदल

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत इयत्ता दहावीच्या लेखी परीक्षेसाठी राज्यातील ७०१ संवेदनशील केंद्रावर केंद्रसंचालक, पर्यवेक्षक व परीक्षेशी संबंधित व्यक्तींची नियुक्ती करताना अदलाबदल करण्यात येणार आहे. यामुळे कॉपी सारख्या गैरमार्गांना आळा बसण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे.
करोना काळातील सन २०२१ व सन २०२२ या दोन परीक्षा वगळून मागील ५ वर्षांच्या म्हणजेच फेब्रुवारी-मार्च २०१८, २०१९, २०२०, २०२३ व २०२४ या परीक्षांमध्ये ज्या परीक्षा केंद्रांवर गैरमार्गाची प्रकरणे आढळून आलेली आहेत अशा परीक्षा केंद्रावर केंद्रसंचालक, पर्यवेक्षक व परीक्षेशी संबंधित व्यक्तींची नियुक्ती सदर केंद्रावर समाविष्ट असणाऱ्या शाळेतील शिक्षक व अन्य कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त इतर अन्य शाळा, उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक व कर्मचाऱ्यांमधून करण्यात येणार आहे. पुणे – १३९, नागपूर – ८६, छत्रपती संभाजीनगर – १५५, मुंबई – १८, कोल्हापूर- ५३, अमरावती – ९८, नाशिक – ९३, लातूर- ५९ या प्रमाणे विभागनिहाय केंद्रामधील केंद्रसंचालक, पर्यवेक्षक यांची अदलाबदल करण्यात येणार आहे. कोकण विभागातील एकाही परीक्षा केंद्राची अदलाबदल होणार नाही.
विद्यार्थ्यांना नैराश्येतून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठी राज्य मंडळ स्तरावरून समुपदेशन करण्यासाठी १० समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. विभागीय स्तरावर मंडळामध्ये जिल्हानिहाय प्रत्येकी दोन याप्रमाणे समुदेशकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच राज्यमंडळ व ९ विभागीय मंडळात नियंत्रण कक्ष कार्यरत करुन हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करुन दिलेली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कोणत्याही गैरप्रकारांच्या प्रलोभनांना बळी पडू नये, असे राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी स्पष्ट केले आहे.
गैरप्रकारांना आळा बसावा या दृष्टीने मंडळामार्फत संपूर्ण राज्यात २७१ भरारी पथके नेमण्यात आली आहेत. याशिवाय प्रत्येक जिल्हयामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समिती कार्यरत असून, काही विभागीय मंडळात विशेष भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. राज्यातील संवेदनशील परीक्षा केंद्र परिसरामध्ये जिल्हा प्रशासनामार्फत ड्रोन कॅमेराद्वारे परीक्षा केंद्राची निगराणी करण्यात येईल. परीक्षा केंद्राच्या बाहेर जिल्हा प्रशासनामार्फत व्हिडीओ चित्रीकरण करण्यात येणार आहे.





