Pune : टोमॅटोने केला शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चिखल !

पुणे : गेल्या वर्षी चांगली कमाई मिळवून देणार्या टोमॅटोने या वर्षी शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. गेल्या वर्षी १०० रुपयांपर्यन्त गेलेले टोमॅटोचे दर यंदा थेट ५ रुपयांवर अल्याने शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चीखल झाला आहे.
आवक वाढल्याने मार्केट यार्डातील घाऊक बाजारात टोमॅटोचे ढीग लगले आहेत, त्यामुळे टोमॅटो घाउक बाजारात किलोला ४ ते ५ रुपये असे कवडीमोल भावाने विकला जात आहे. किरकोळ बाजारात टोमॅटोची विक्री कीलोला १० ते २० रुपये भावाने होत आहे. टोमॅटोचे दर असे अचानक कोसळल्याने शेतकऱ्यांना उत्पादन खर्च तर सोडाच, साधा माल बाजारात आणण्यासाठी लगणारा खर्चही मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात किरकोळ बाजारात एक किलो टोमॅटोचे भाव शंभर रुपयांपर्यंत गेले होते. पावसामुळे टोमॅटोची आवक कमी झाल्याने भावात वाढ झाली होती. टोमॅटोला भाव मिळाल्याने पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, नाशिक, सोलापूरसह राज्यातील सर्व विभागातील शेतकऱ्यांनी टोमॅटोची मोठ्या प्रमाणावर लागवड केली होती. लागवड चांगली झाल्याने गेल्या महिन्याभरापासून राज्यातील सर्व बाजार समितींच्या आवारात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर टोमॅटो विक्रीस पाठविला.
टोमॅटोची आवक वाढल्याने भावात घट झाली.
येथील बाजारात जिल्ह्यातील खेड, मंचर, आंबेगाव, जुन्नर परिसरातून टोमॅटो मोठ्या प्रमाणावर विक्रीस पाठविले जातात. मार्केट यार्डातील घाऊक बाजारात दररोज ८ ते ९ हजार पेटी टोमॅटोची आवक होत आहे. ही टोमॅटोची आवक नेहमीच्या तुलनेत दुप्पट आहे. परिणामी भावात घट झाल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
गेल्या वर्षी टोमॅटोला चांगला भाव मिळाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी टोमॅटोची मोठ्या प्रमाणवर लागवड केली. त्यामुळे सर्वच भगतून् आवक वाढली आहे. परराज्यातून टोमॅटोला असणारी मागणीही कमी झाली आहे. त्यामुळे टोमॅटोला कवडीमोल भाव मिळत आहे.
– अमोल घुले, आडतदार, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डशेतकरी हवालदील!
लागवड केलेल्या टोमॅटोला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांसमोर संकट उभे राहिले आहे. घाऊक बाजारात ४ ते ५ रुपये किलो भाव मिळत असल्याने टोमॅटो फेकून देण्याशिवाय पर्याय उरला नाही. त्यामुळे बाजारात टोमॅटोचा चीखल झाला आहे. तोडणी आणि वाहतूक खर्च परवडत नाही, एका प्लास्टिकच्या जाळीत (क्रेट) २२ किलो टोमॅटो बसतात. घाऊक बाजारात एका प्लास्टिक जाळीला ७० ते ८० रुपये भाव मिळत आहे.
– अजित तांबे, टोमॅटो उत्पादक शेतकरी, वरुडे, ता. शिरुर
टोमॅटोचे भाव
मार्केट यार्ड घाऊक बाजार (१० किलो) ४० ते ५० रुपये
किरकोळ बाजार (१ किलो) १० ते २० रुपये





