Pune : पालखी कालावधीत स्वच्छतागृह असणार मोफत; ५० हजार सॅनिटरी पॅडचे वाटप

पुणे : शहरात पालखी मुक्कामाच्या दोन्ही दिवशी महापालिकेची शहरातील सर्व सःशुल्क स्वच्छतागृहे मोफत असणार आहेत. वारकऱ्यांच्या सुविधेसाठी महापालिका प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला असून, त्याबाबत स्वच्छतागृहांच्या व्यवस्थापकांना सूचना देण्यात आली आहे.
याशिवाय, शहरभर पालखी मार्गावर तसेच मुक्कामाच्या ठिकाणी १८०० मोबाईल टॉयलेट्सची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख उपायुक्त संदीप कदम यांनी दिली.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा येत्या शुक्रवारी (दि. २०) पुण्यात मुक्कामी येत आहे. त्यासाठी महापालिका प्रशासनाकडून शहरातील स्वच्छतेचे नियोजन करण्यात आले आहे.
तीन वेळा स्वच्छता
शहरात पालखी मार्ग तसेच पालखी मुक्कामाच्या ठिकाणांसह संपूर्ण शहरात तीन वेळा स्वच्छता केली जाणार आहे. याशिवाय, पावसाळ्याचे दिवस असल्याने रस्त्याच्या कडेला असलेला कचरा तसेच राडारोडा उचलण्यात आला असून, त्या ठिकाणी औषध फवारणीही करण्यात आलेली आहे आणि पालखी कालावधीतही ती केली जाणार आहे. शहरात महापालिकेची १२०० हून अधिक स्वच्छतागृहे असून, सार्वजनिक ठिकाणी सःशुल्क स्वच्छतागृहे आहेत. या ठिकाणी शुल्क आकारले जाते. मात्र, पालखी कालावधीत कुठेही हे शुल्क आकारले जाणार नाही. तसेच, शहरात जागोजागी १८०० मोबाईल टॉयलेट्स उपलब्ध असणार आहेत. याशिवाय, पालखी मुक्कामी असलेल्या भागातील महापालिकेच्या शाळांमध्येही स्वच्छता करण्यात आली असून, या ठिकाणची स्वच्छतागृहे जेटिंग मशीनद्वारे तीन वेळा स्वच्छ केली जाणार आहेत.
५० हजार सॅनिटरी पॅड
पालखी मुक्कामाच्या कालावधीत महिलांसाठी ५० हजार सॅनिटरी पॅडचे वाटप केले जाणार आहे. राज्य महिला आयोगाकडून पालखी सोहळ्यासाठी ‘आरोग्य वारी’ हा उपक्रम राबविण्यात येत असून, त्या अंतर्गत महिला वारकऱ्यांसाठी हे पॅड उपलब्ध करून दिले जाणार आहेत. महापालिकेकडून पालखी मार्गावर उभारण्यात येणारे वैद्यकीय मदत कक्ष तसेच पालखी मुक्कामाच्या ठिकाणी असलेल्या महापालिकेच्या फिरत्या दवाखान्यांच्या माध्यमातून ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.





