पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ मधील उन्हाळी सत्र परीक्षा लवकरच सुरु होत आहेत. या परीक्षेसाठी अर्ज भरण्याची मुदत आज संपली. त्यानंतर परीक्षेचे हाॅलतिकीट विद्यार्थ्यांचे संबंधित महाविद्यालयात पाठविण्यात येत आहे. या हाॅल तिकीटामध्ये काही दुरुस्ती करावयाची असल्यास, उद्या (दि. २८) रात्री बारा वाजेपर्यंत करता येणार आहे. यासंबंधीचे परिपत्रक विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डाॅ. प्रभाकर देसाई यांनी प्रसिद्ध केले आहे. त्यात शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ मधील उन्हाळी सत्रात येणाऱ्या नियमित अथवा पुनर्परीक्षार्थ्यांची एकत्रित प्रवेशपत्रे अर्थात हाॅलतिकीट संबंधित महाविद्यालयास त्यांच्या लाॅगीनमध्ये उपलब्ध करुन देण्यात आलेली आहेत. हाॅलतिकीटात काही त्रुटी, म्हणजेच आवश्यक असलेल्या विषयाचा समावेश नसणे, नावातील दुरस्ती, अतिरिक्त अथवा कमी विषय, विषयाचा समावेश नसणे इत्यादी आवश्यक ती दुरुस्ती महाविद्यालयाने करावी. दुरुस्तीसाठी दि. २८ माचपर्यंत अंतिम मुदत आहे.