निगडी -संपूर्ण भारतामधील क्रीडा आणि आरोग्य क्षेत्रामध्ये काम करणारे इंडो अथलेटिक्स सोसायटीतर्फे सालाबाद प्रमाणे होणाऱ्या पुणे पंढरपूर पुणे सायकल वारीचे देहू येथील गाथा मंदिर येथून प्रस्थान करण्यात आले. यंदाचे सायकल वारीचे सहावे वर्ष आहे. अकराशेहून अधिक सायकलस्वारांनी या वारीत सहभाग नोंदविला आहे. एप्रिल महिन्यामध्ये आकुर्डी येथील विठ्ठल मंदिरामध्ये एकादशीनिमित्त रजिस्ट्रेशन सुरू करण्यात आले होते. सनदी लेखापाल कृष्णलाल बंसल, माजी नगरसेवक अमित गावडे यांच्यातर्फे झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली. इंडो अथलेटिक्स सोसायटीचे गजानन खैरे, गणेश भुजबळ, अजित पाटील या वेळी उपस्थित होते. सदर वारीचे सहावे वर्ष असून, दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील सर्व 1200 हून अधिक सभासद एक दिवसात देहू ते पंढरपूर असे दोनशे पन्नास किलोमीटर अंतर तर दुसऱ्या दिवशी पंढरपूर ते आळंदी अशी परतीची वारी करणार आहेत असे इंडो अथलेटिक्स सोसायटीचे गजानन खैरे यांच्यातर्फे सांगण्यात आले. आय ए एसचा वारीचे विशेष म्हणजे मागील वर्षी अमावस्येच्या दिवशी रात्री भर पावसामध्ये 170 सायकलस्वारांनी पुणे ते पंढरपूर असा प्रवास केला होता. आयएएसच्या महिला विभाग प्रमुख अमृता पाटील यांच्या हस्ते विविध संस्थांचा सत्कार करण्यात आला.