Pune : तेरा हजार लाभार्थ्यांना घरे मिळणार का?

पुणे: प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत पुणे जिल्ह्यातील घरकुल योजनेच्या ३३ हजार लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करण्यात आले आहेत; मात्र त्यापैकी २० हजार लाभार्थ्यांनाच अनुदानाचा पहिला हप्ता मिळाला आहे. सुमारे १३ हजार लाभार्थी घरकुलासाठी प्रतिक्षेत आहेत. स्वत:ची जागा आणि कागदपत्रे नसल्याने घरकुलसाठी अनुदान देणे जिल्हा परिषदेपुढे आव्हान बनले आहे. त्यामुळे १३ हजार लाभार्थ्यांना हक्काची घरे मिळणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना अनुदानाच्या पहिल्या हप्त्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते बालेवाडी येथील कार्यक्रमात वाटप करण्यात आले. सात हजार लाभार्थ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत पुणे जिल्ह्याला राज्य सरकारने ३७ हजार घरकुल मंजूर करण्याचे उद्दिष्ट दिले होते. त्यापैकी ३३ हजार लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करण्यात आले आहेत.
कार्यक्रमाच्या दिवशी एकूण मंजूर लाभार्थ्यांपैकी सुमारे १९ हजार जणांच्या खात्यात अनुदानाचा पहिला हप्ता जमा करण्यात आला. या लाभार्थ्यांना एकूण एक लाख २० हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे. त्याबाबत लाभार्थ्यांच्या मोबाईलवर १५ हजार रुपयांच्या अनुदानाचा पहिला हप्ता देण्यात आला. पुणे जिल्ह्यात एकूण ३० कोटी रुपये देण्यात आले आहे. दरम्यान, कार्यक्रमाच्या दिवशी सुमारे १९ हजार जणांना लाभ देण्यात आला असला तरी, आतापर्यंत आणखी सुमारे एकहजार जणांपर्यंत पहिला हप्ता मिळाला आहे. त्यामुळे पहिला हप्ता मिळालेल्यांची संख्या २० हजारापर्यंत पोहोचली आहे.
भूमिहीनांसाठी जागेची मागणी
पुणे जिल्ह्यातील घरकुल योजनेसाठी मंजूर लाभार्थ्यांमध्ये अनेकांकडे स्वतःची जमीन नाही. त्यांच्या नावावर कोणतीही कागदपत्रे उपलब्ध नाहीत. तसेच जमीन असल्यास त्याचे पुरेसे पुरावे उपलब्ध नाहीत. त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे या भूमीहिनांसाठी जागेची मागणी केली आहे.
कागदपत्र मिळताच अनुदान
प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत आतापर्यंत सुमारे २० हजार लाभार्थ्यांना अनुदानाचा पहिला हप्ता देण्यात आला आहे. उर्वरीत लाभार्थ्यांकडे जमीन, पुरेशी कागदपत्रे नाहीत. तसेच बँकेशी आधार कार्ड लिंक केले नसल्याने अनुदान मिळू शकले नाही. कागदपत्रांची पूर्तता झाल्यास अनुदान दिले जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेकडून देण्यात आली.





