Pune : संक्रांतीच्या दिवशी चोरट्यांचा धुमाकूळ

पुणे : संक्रातीच्या दिवशी चोरट्यांनी शहरात धुमाकूळ घातला. वेगवेगळ्या घटनेत दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलांकडील तीन लाखांचे दागिने चोरुन नेले. धनकवडी, बिबवेवाडी, वानवडी परिसरात या घटना घडल्या.
धनकवडी परिसरात पादचारी ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील एक लाख २० हजारांचे मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना घडली. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संबंधित महिला मंगळवारी दुपारी धनकवडीतील त्रिमूर्ती चौकातून जात होत्या. रस्ता ओलांडताना दुचाकीस्वार आडवा आला. त्याच्या साथीदाराने महिलेचे मंगळसूत्र पळवले. सहायक पोलीस निरीक्षक सागर पाटील तपास करत आहेत.
वानवडीत लष्करी रुग्णालयाजवळ दुचाकीस्वार महिलेच्या गळ्यातील एक लाख २० हजारांचे मंगळसूत्र चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत एका महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हे चोरटे महिलेचा पाठलाग करत असल्याचे समोर आले आहे. पोलीस उपनिरीक्षक धनाजी टोणे तपास करत आहेत.
तर, सुखसागरनगर परिसरात पादचारी महिलेच्या गळ्यातील ९० हजारांचे मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्यांनी पळवले. याबाबत महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी तपास करत आहेत.





