Pune : वैष्णवीच्या छळाबाबत आयोगाकडे तक्रार नव्हती

पुणे : वैष्णवीच्या कुटुंबाची कोणतीही तक्रार महिला आयोगाकडे नव्हती. मात्र, आम्ही घटना घडल्यानंतर सुमोटो तक्रार दाखल केली. याप्रकरणी हगवणे कुटुंबातील पाच जणांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. यासंदर्भात बावधन पोलीस चांगल्या पद्धतीने काम करत आहे. त्यामुळे महिला आयोग गंभीर नाही, ही टीका योग्य नसल्याचे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी स्पष्ट केले.
वैष्णवीच्या मृत्यूप्रकरणी, तसेच तिची जाऊ मयूरी हिने २०२४ मध्ये दिलेल्या तक्रारीबाबत महिला आयोगाने नेमके काय केले? याचे उत्तर आज आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पोलीस पत्रकार परिषद घेऊन दिले.
चाकणकर म्हणाल्या, की वैष्णवीच्या छळाबाबत महिला आयोगाकडे कुठलीही तक्रार आली नव्हती. मात्र, आत्महत्येची घटना घडल्यावर मी स्वतः याबाबत सु मोटो तक्रार दखल करून आरोपींना अटक केली आहे. अजून काही गुन्हे दाखल करायचे आहेत. याप्रकरणी पोलिसांशी बोलणे सुरू आहे. यात अजून काही कलमं लागतील का? याबाबत अधिकाऱ्यांकडे विचारणाही केली आहे. याप्रकरणी पाच आरोपींविरोधात गुन्हा दाखल झाला असून, सगळ्यांना अटक झाली आहे. त्याचबरोबर वैष्णवीच्या बाळाला तिच्या आई- वडिलांकडं सोपवताना काय घडलं? याची मी स्वतः माहिती दिली.
नणंद भावजयीच्या एकाच दिवशी परस्परविरोधी तक्रारी
वैष्णवीच्या मोठ्या जावेबद्दल सांगताना चाकणकर म्हणाल्या, की आमच्याकडे एकाच दिवशी दोन तक्रारी मेलवरून दाखल झाल्या. यामध्ये सुरुवातीला ६ नोव्हेंबर २०२४ रोजी मेघराज जगताप जे मयूरी जगताप हिचे भाऊ आहेत, त्यांनी तक्रार केली. त्यानंतर रात्री १२ वाजता मयूरी जगताप यांची नणंद करिश्मा हगवणे हिची ई-मेलवरून तक्रार आली. एकाच दिवशी दोन तक्रारी आल्याने बावधन पोलिसांकडे या तक्रारी पाठवल्या आणि कारवाईच्या सूचना दिल्या.
हा एकाच कुटुंबातील वाद असल्याने आणि परस्परविरोधी तक्रारी आल्याने हा कौटुंबिक वाद भरोसा सेलमध्ये काऊन्सिलिंग करून सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. नियमानुसार तीन वेळा काउन्सिलिंग करणे गरजेचे असते. त्यानुसार यामध्ये प्रक्रिया पार पाडण्यात आली. दरम्यान आज याप्रकरणी दोषारोप पत्र दाखल होत असल्याची माहिती चाकणकर यांनी दिली.
राजकीय दबाव असता तर…
राजकीय दबाव असता, तर सु मोटो तक्रार केली नसती. दोन्ही महिला असल्याने कौटुंबिक विषय असल्याने समुपदेशनाच्या माध्यमातून कुटुंब एकत्र आणण्याचा प्रयत्न केला जात होता. याप्रकरणी आम्ही २४ तासांत एफआयआर दाखल करायला लावली. त्यामुळे विरोधकांचे आरोप आम्ही फेटाळून लावत आहेत.




