Pune : कक्ष आहे… पण कर्मचारी आहेत कुठे?

संदीप घोडके
पुणे – आईचे ऑपरेशन झाले, चार दिवस झाले; पण बिल भरता येत नाही म्हणून रुग्णालयाने डिस्चार्ज दिला नाही. दोन दिवस झाले कक्षात चकरा मारतोय… पण इथे कुणीच नाही.., अशा हतबल शब्दांत एका रुग्णाच्या नातेवाईकाने आपल्या वेदना व्यक्त केल्या. असा अनुभव मागील पंधरा दिवसांपासून अनके नागरिक पुण्यातील जुन्या जिल्हा परिषदेच्या मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मदाय रुग्णालय मदत कक्षात घेत असून, हा कक्ष मदतीसाठी सुरू केला, की त्रास देण्यासाठी, असा सवाल उपस्थित करत आहेत.
अवघ्या दीड ते दोन महिन्यांपूर्वी उपचाराच्या खर्चासाठी पैसे नसल्याने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गरोदर महिलेच्या मृत्यूनंतर खडबडून जागे झालेल्या राज्य शासनाने पुण्यात सर्वसामान्य, तसेच आर्थिक दुर्बल घटकांच्या बाबतीत पुन्हा असे प्रकार घडू नयेत, यासाठी राज्य शासनाच्या सूचनेनुसार १ मे पासून जुनी जिल्हा परिषद येथे मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष सुरू केला.
मात्र, मागील दोन आठवड्यांपासून या ठिकाणी एकही अधिकारी किंवा कर्मचारी वेळेत येत नाहीत; शिवाय वारंवार अनुपस्थित राहात असल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल झालेल्या आणि दाखल होण्यासाठी मदत हव्या असलेल्या रुग्णांची फरफट सुरू आहे. हा कक्ष केवळ कागदावरच असून, त्याकडे लक्ष देण्यासाठी कोणालाही वेळ नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे नातेवाईक दिवसभर रांगेत उभे राहतात. कदाचित आज तरी कोणी अधिकारी भेटेल, या आशेने दरवाजाकडे डोळे लावून वाट पाहतात; पण दररोज पदरी निराशाच घेऊन माघारी जात आहेत.
अधिकारी- कर्मचारी वारीत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून यंदाच्या पालखी सोहळ्यात वारकऱ्यांची चरण सेवा हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्याची जबाबदारी या सहाय्यता कक्षाकडे देण्यात आली आहे. त्यामुळे या कक्षाचे कर्मचारी पालखीसोबत गेले आहेत. प्रत्यक्षात या कर्मचाऱ्यांनी सासवडपर्यंत जाणे आवश्यक असताना त्यानंतरही काही कर्मचारी याच कामात आहेत. त्यामुळे या मदत कक्षाला टाळे लावण्याची वेळ आली आहे. याबाबत कक्षाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, संपर्क होऊ शकला नाही.
‘मोठ्या गाजावाजा करत सुरू झालेल्या या कक्षामुळे काही मदत मिळेल, अशी आशा होती. मात्र आता हे कार्यालय केवळ फसवणुकीचं ठिकाण वाटू लागलं आहे.’ – शाम गायकवाड, अध्यक्ष, भीमछावा संघटना





