Pune : विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात

पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हाती घेतलेल्या पुणे विद्यापीठ चौकातील दुमजली उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पाषाणकडील रॅम्पचे काम वगळता जूनअखेर हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणार आहे. त्या दृष्टीने प्राधिकरणाने नियोजन केले आहे. त्यामुळे गणेशखिंड रस्त्यावरील प्रवाशांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे.
हिंजवडी ते शिवाजीनगरदरम्यान मेट्रो प्रकल्प आणि गणेशखिंड व सेनापती बापट रस्त्यावरून पाषाण, बाणेर आणि औंधकडे सुरळीत वाहतुकीसाठी पुणे विद्यापीठ चौकात दुमजली उड्डाणपुलाचे काम हाती घेण्यात आले आहे. गणेशखिंड रस्त्यावरील ई-स्केवर आणि बाणेर येथे ज्या ठिकाणी पूल उतणार आहे. त्या ठिकाणच्या पिलर्सचे काम पूर्ण झाले आहे. मुख्य चौकात उड्डाणपुलाचा खांब (पिलर्स) उभारण्याचे काम यापूर्वीच पूर्ण झाले आहे.
त्यावर ५५ मीटर लांबीचे आणि सुमारे १८ ते २० मीटर रुंदीचे लोखंडी गर्डरचे स्पॅन टाकण्याचे काम वेगाने सुरू आहे. हा दुमजली उड्डाणपूल असल्याने ३२ खांब असून ते उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे, अशी माहिती पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी दिली. यापूर्वी मे महिन्यात पुलाचे काम पूर्ण होऊन तो वाहतुकीसाठी खुला होईल, असे सांगण्यात आले होते. परंतु जागा ताब्यात मिळण्यास आणि रस्तारूंदीच्या कामास विलंब झाल्याने उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होण्यास जून महिना लागणार आहे.
औंध आणि शिवाजीनगर कडील रॅम्पचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. २० मे पर्यंत ते वाहतुकीसाठी खुले होऊ शकतात. तर बाणेरकडील रॅम्पचे युटिलीटीचे हलविण्याचे काम देखील होत आले आहे. पाषाणकडे रॅम्पचे काम वगळता तीस जूनपर्यंत उड्डाणपुलाचे काम पूर्ण होईल, असा विश्वास प्राधिकरणाकडून व्यक्त करण्यात आला.





