Pune : ९९ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाची स्थळ निश्चिती आठ जूनला

पुणे : आगामी ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची स्थळनिश्चिती येत्या आठ जून रोजी होणार असल्याची माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी गुरूवारी दिली.
आगामी संमेलनासाठी सदानंद साहित्य मंडळ, औदुंबर, महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा इचलकरंजी, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर आणि महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा शाहूपुरी, सातारा या संस्थांकडून निमंत्रणे आली आहेत. संमेलनाचे स्थळ निश्चित करण्यासाठी स्थळ निवड समिती गठित करण्यात आली आहे.
ही समिती पाच ते सात जून या कालावधीत निमंत्रक संस्थांना भेट देणार आहे. त्यानंतर या निवड समितीची आठ जून रोजी पुण्यात बैठक होऊन ते स्थळांसंबंधीची शिफारस करतील. त्यानंतर सकाळी ११ वाजता अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची बैठक होणार असून, त्यात ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्थळावरती शिक्कामोर्तब होईल आणि ते स्थळ जाहीर केले जाणार आहे.
स्थळ निवड समितीत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते, मराठवाडा साहित्य परिषदेचे रामचंद्र काळुंखे, मुंबई मराठी साहित्य संघाच्या प्रतिभा सराफ यांचा समावेश आहे.




