PUNE: परिवहन विभागाची यंत्रणा तिसर्या दिवशीही ठप्पच

पुणे – प्रादेशिक परिवहन विभागाकडील वाहन परवाना (लायसन्स) देण्याची ऑनलाईन यंत्रणा सुरू झाली, असे परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले. मात्र, कार्यालय बंद झाल्यावर ही यंत्रणा सुरू झाली आणि काही तासांतच पुन्हा ठप्प झाली. शनिवारी (दि. ३) या वेबसाईटवर ‘सर्व्हरचे काम सुरू असून, यंत्रणा बंद’ असल्याचे दर्शविण्यात आले होते. त्यामुळे तिसऱ्या दिवशीही ही यंत्रणा ठप्प असल्याचे दिसून आले.
परिवहन विभागाची वाहन परवाना देण्याची सारथी यंत्रणा गेल्या दोन ते तीन दिवसांपासून ठप्प आहे. त्यामुळे पक्के आणि शिकाऊ वाहन परवान्यासाठी अपॉइंटमेंट घेतलेल्या नागरिकांना विनाकारण आरटीओच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत. नागरिक लायसन्ससाठी कार्यालयास सुट्ट्या टाकून येतात. मात्र, आरटीओत आल्यानंतर यंत्रणा बंद असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांना मनस्तापाबरोबरच आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
शुक्रवारी (दि. ३) दिवसभर ही यंत्रणा बंद होती. नागरिकांकडून आरडाओरडा सुरू झाल्यानंतर पुणे प्रादेशिक परिवहन विभागाने कार्यालयात सारथीची यंत्रणा बंद असल्याचा फलक लावला. याबाबत अधिकाऱ्यांना विचारणा केली असता, संपूर्ण देशातील यंत्रणा बंद असून, सायंकाळी ही यंत्रणा सुरू झाल्याचा दावा केला. मात्र, तोपर्यंत कार्यालये बंद झाली. दुसर्या दिवशी ऑनलाईन परवान्यांसाठी सारथी वेबसाईट सुरू केल्यावर यंत्रणा अजूनही ठप्पच असल्याचे दिसून आले. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
“आरटीओतील वाहन परवाने काढण्याची ऑनलाईन यंत्रणा वारंवार बंद पडत आहे. त्यामुळे नागरिकांना मनस्ताप आणि आर्थिक भुर्दंड बसत आहे. आरटीओ प्रशासनाने नागरिकांचा विचार करता, सर्व्हरची कामे सुट्टीच्या दिवशी करावीत, जेणेकरून नागरिकांचे हेलपाटे वाचतील आणि कामे तात्काळ मार्गी लागतील.” – अनुज शिंदे – राज्य मोटार ड्रायव्हिंग असोसिएशन




