Pune : उन्हा उलगडणार पुण्याचा इतिहास

पुणे : शहरात येणाऱ्या पर्यटकांना जुन्या पुण्याची ओळख करून देण्यासह शहरातील ऐतिहासिक वास्तूंची माहिती देण्यासाठी पुणे महापालिकेचा हेरीटेज वॉक उपक्रम पुन्हा सुरू केला जाणार आहे. हा उपक्रम पुन्हा सुरू करण्याच्या प्रस्तावास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.
पुणे शहर आणि त्याच्या जडणघडणीचे महत्त्व पर्यटकांना, नागरिक आणि तरुणांना कळावे, यासाठी २०१२ मध्ये महापालिका आणि जनवाणी संस्थेने हेरीटेज वॉक उपक्रम सुरू केला होता. या उपक्रमांतर्गत शनिवारवाड्यापासून विश्रामबागवाड्यापर्यंतच्या १५ ऐतिहासिक वास्तूंची माहिती तज्ज्ञ आणि अभ्यासकांकडून दिली जात असे. दोन वर्षे हा उपक्रम सुरू होता आणि त्याला चांगला प्रतिसादही मिळाला होता, तसेच राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कारही मिळाला होता. मात्र, पालिकेने त्यात सातत्य न ठेवल्याने तो बंद पडला होता.
दरम्यान, २०२३-२४ मध्ये पुन्हा एकदा प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम एक वर्षासाठी पुन्हा सुरू करण्यात आला होता. दर शनिवारी आणि रविवारी सकाळी होणाऱ्या या उपक्रमालाही नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता खासगी पद्धतीने हेरीटेज वॉक उपक्रम राबवणाऱ्या डॉ. अजित आपटे यांनी हा उपक्रम पुन्हा सुरू करण्यासंदर्भात महापालिकेकडे प्रस्ताव दिला आहे.
त्यास मान्यता देण्यात आली असून, दर शनिवारी आणि रविवारी सकाळी ७ ते ९.३० या वेळेत हा वाॅक होणार आहे. सुमारे अडीच किलोमीटरच्या या प्रवासात छत्रपती शिवाजी महाराज पूल, घोरपडे घाट, शनिवारवाडा, कसबा गणपती मंदिर, लाल महाल, भिडेवाडा, बेलबाग मंदिर, पुणे नगरवाचन मंदिर, तुळशीबाग, महात्मा फुले मंडई विश्रामबागवाडा ही ठिकाणी दाखविली जाणार आहेत.





