pune: टाळ-मृदंग आणि विठूनामाच्या गजराने सूर्यदत्त स्कूलमध्ये अवतरले पंढरपूर

pune: टाळ-मृदंगाचा गजर, ‘ज्ञानोबा-तुकाराम’चा जयघोष आणि वारकरी वेषातील चिमुकल्यांच्या भक्तिमय उत्साहाने सूर्यदत्त नॅशनल स्कूलचा परिसर आषाढी एकादशीनिमित्त अक्षरशः दुमदुमून गेला.
महाराष्ट्राच्या समृद्ध वारकरी परंपरेचे संस्कार रुजवण्यासाठी आणि जलसंवर्धनाचा जागर करण्यासाठी शाळेत पारंपरिक पालखी सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला.
पारंपरिक वेशभूषा, डोक्यावर तुळशी वृंदावन आणि हातात भगव्या पताका घेतलेल्या विद्यार्थ्यांनी या दिंडीत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. अभंग, भक्तिगीते आणि सांस्कृतिक सादरीकरणाने संपूर्ण परिसर पंढरपूरच्या वारीसारखा भक्तिमय झाला होता.
यंदाच्या सोहळ्यात ‘जलसंवर्धन’ हा विशेष सामाजिक संदेश देण्यात आला. पाणी बचत, पर्जन्यजल संचयन आणि पाण्याचा जबाबदारीने वापर याविषयी विद्यार्थ्यांना कृतिप्रधान मार्गदर्शन करण्यात आले.
दरम्यान, वारी ही भक्ती, समता आणि सामाजिक ऐक्याचे प्रतीक असून, संस्कृतीसोबत पर्यावरण संवर्धनाची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये रुजवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे, अशी भावना सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय चोरडिया यांनी व्यक्त केली.





