पुणे : शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिकेने स्मार्ट सिटीच्या माध्यमातून उभारलेली अत्याधुनिक सिग्नल यंत्रणा (एटीएमएस सिस्टीम) आणि महापालिकेकडे असलेले सिग्नल अखेर पोलिसांच्या ताब्यात जाणार आहेत. स्मार्ट सिटीचा कार्यकाळ संपत आल्याने ही यंत्रणा कोणाकडे हस्तांतरित करायची, यावरून गेल्या सहा महिन्यांपासून महापालिका पोलीस आणि स्मार्ट सिटीमध्ये बैठका सुरू आहेत. मात्र, अखेर या प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तोडगा कढत महागरपालिकेकडे असलेली वाहतूक सिग्नल यंत्रणा पोलीस आयुक्तालयाकडे हस्तांतरित करावी. स्मार्ट सिटी कार्यालयातील वाहतूक व्यवस्थापन यंत्रणेंतर्गत कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांची सेवा पोलीस आयुक्ताकडे वर्ग करावी, असे आदेश उपमुख्यमंत्री पवार यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत तिन्ही विभागांना दिले आहेत. या प्रकल्पाअंतर्गत शहरातील १२४ चौकांमध्ये अत्याधुनिक सिग्नल यंत्रणा बसविण्यात आली आहे. वाहनांची वर्दळ आणि वाहतुकीचा वेग लक्षात घेऊन ही यंत्रणा शहरातील सर्व सिग्नलचे नियंत्रण करते. त्यामुळे रस्त्यावर असलेल्या वाहनांच्या संख्येनुसार ही यंत्रणा सिग्नलची वेळ कमी अधिक करते. या प्रकल्पासाठी सुमारे १०२ कोटींचा खर्च करण्यात आला असून, ही यंत्रणा उभारणाऱ्या कंपनीस प्रत्येक वर्षासाठी ११ कोटींचा देखभाल दुरुस्तीचा खर्च महापालिका देणार आहे. या शिवाय, आणखी १२३ चौकांमध्ये सिग्नल यंत्रणा असून त्याचे कामकाज महापालिका पाहते. त्यामुळे वाहतुकीच्या एकाच कामासाठी स्मार्ट सिटी, महापालिका आणि वाहतूक पोलीसही कार्यरत आहेत. मात्र, या तीन यंत्रणांमध्ये समन्वय नसल्याने या सिग्नल यंत्रणेचा परिणामकारक वापर होत नसल्याने ही यंत्रणा आता पोलिसांकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला अाहे.