Pune : शिवसृष्टीचा दुसरा टप्पा तयार येत्या शिवजयंतीला होणार लोकार्पण

पुणे : महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानच्यावतीने आंबेगाव ब्रुद्रुक येथे साकारत असलेल्या शिवसृष्टीचा दुसरा टप्पा आता पूर्णत्वास आला असून, येत्या शिवजयंतीच्या दिवशी (१९ फेब्रु.) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या टप्प्याचे लोकार्पण होणार आहे.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपस्थित असतील अशी माहिती महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे मुख्य विश्वस्त जगदीश कदम यांनी गुरुवारी शिवसृष्टी येथे पत्रकारांशी बोलताना दिली. यावेळी प्रतिष्ठानचे विश्वस्त विनीत कुबेर, सल्लागार संदीप जाधव आणि शिवसृष्टीचे व्यवस्थापक अनिल पवार उपस्थित होते.
पद्म विभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या मूळ संकल्पनेतून साकारत असलेल्या या शिवसृष्टी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याची कदम यांनी माहिती दिली. छत्रपती शिवाजी महाराज एक माणूस म्हणून कसे होते हे देखील लोकांपर्यंत पोहोचवायला हवे, असे बाबासाहेब पुरंदरे यांचे स्वप्न होते.
त्यानुसार या टप्प्याची रचना करण्यात आली आहे. या टप्प्याच्या निर्मितीमध्ये सुमारे ८७ कोटी रुपये इतकी गुंतवणूक करण्यात आली असून, स्वदेश, स्वधर्म आणि स्वभाषा ही शिवाजी महाराजांना जवळची असणारी महत्वाची ३ तत्वे यावर या टप्प्याच्या निर्मितीमध्ये विशेष लक्ष केंद्रित करण्यात आल्याचे कदम यांनी सांगितले.
काय आहे या टप्प्यात
– टाइम मशीन थिएटर – यामध्ये मॅपिंग, होलोग्राफी, फिजिकल इफेक्ट्स आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ३६० अंशामध्ये फिरणारे रोटेटिंग अर्थात फिरते थिएटर, ज्यावर एका वेळी ११० व्यक्ती या विशेष अशा ३३ मिनिटांच्या शोचा अनुभव घेऊ शकतील.
– या दालनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे ६ मोठे पोर्ट्रेट्स लावण्यात आले आहेत.
– या पोर्ट्रेट्सचे वैशिष्ट्य असे आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात काढलेल्या आणि सध्या जगातील प्रसिद्ध संग्रहालयांमध्ये असलेल्या चित्रांच्या (पेंटिंग्ज) हाय रेझोल्युशन इमेजेसच्या या प्रिंट्स आहेत. यामध्ये द हेग नॅशनल आर्काईव्हज व नॅशनल लायब्ररी ऑफ नेदरलँड्स, रिक्स म्युझिअम अॅमस्टरडॅम, ब्रिटीश म्युझिअम लंडन, बिल्बीओथेक नॅशनल पॅरीस व छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, मुंबई येथील पेंटिंग्जचा समावेश आहे.
– लीडिंग फ्रॉम द फ्रंट अशी ख्याती असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या हयातीत खूप लढायांचे नेतृत्व केले. त्यातील आपल्याला फारशा माहिती नसलेल्या लढायांची माहिती येथे लिखित स्वरूपात मराठी, हिंदी व इंग्रजी या तीन भाषांमध्ये देण्यात आली आहे.
– स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भोसले घराण्याचे कुलदैवत असलेल्या तुळजा भवानी मातेचे मंदिरही या टप्प्यात साकारण्यात आले आहे.





