Pune : जीबीएसचा धोका पुन्हा वाढला

पुणे : सिंहगड रस्ता परिसरात महिनाभर थैमान घालणाऱ्या गुलेन बॅरे सिंड्रोमची (जीबीएस) साथ ओसरली, असे वाटत असतानाच या साथीने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. काही दिवसांपासून समाविष्ट गावांमध्ये या आजाराची लक्षणे असलेले रुग्ण आढळून येत आहेत.
विशेषतः धायरी आणि नऱ्हे परिसरात गेल्या आठवड्यात नवीन संशयित रुग्ण नोंदविले गेले आहेत. त्यामुळे या भागात तातडीन शुद्ध पाण्यासाठी उपाय योजन कराव्यात तसेच या भागातील पाण्याची तपासणी करावी, असे पत्र आरोग्य विभागाने महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागास दिले आहे.
डेक्कन येथील खासगी रुग्णालयात एका सात वर्षीय मुलावर जीबीएसचे आयसीयूमध्ये व्हेंटिलेटरवर उपचार सुरू आहेत. हा मुलगा मानाजी नगर, नवले ब्रिज परिसरातील रहिवासी असून, तो पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठ्यावर अवलंबून आहे. दिनानाथ मंगेशकर रुग्णालयातही धायरी गावातील एका रुग्णाला गंभीर स्थितीत दाखल करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी ससून रुग्णालयात दाखल असलेल्या एका १० वर्षीय रुग्णाच्या पाणीपुरवठ्याच्या स्त्रोतांची तपासणी करण्यात आली होती.
तपासणीमध्ये मानाजीनगर येथील खासगी विहिरीचे पाणी आणि एका खासगी आर.ओ.प्रकल्पाचे पाणी वापरत असल्याचे समोर आले आहे. तर, या पूर्वीच्या तपासणीत या आर.ओ. प्रकल्पाचे पाणी दूषित असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या भागात पुन्हा या साथीचा प्रसार होण्याचा धोका असल्याने तातडीने या तीनही ठिकाणांच्या पाण्याची तपासणी करून या भागात शुद्ध पाणी पुरवठ्यासाठी उपाय योजना करण्याच्या सूचना पाणीपुरवठा विभागास करण्यात आल्या आहेत.




