पुणे, दि. 25 -नवले पूल येथे गेल्या रविवारी झालेल्या भीषण अपघाताचे तांत्रिक विश्लेषण करणाचा अहवाल पुणे प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) चार दिवसांनंतर तयार करून सिंहगड रोड पोलिसांकडे सादर केला आहे. हा अपघात कशामुळे झाला, या अपघाताला चालक जबाबदार आहे, की राष्ट्रीय महामार्गचा आराखडा चुकला असल्याने हा अपघात झाला, हे आरटीओने अद्यापही उघड केलेले नाही. त्यामुळे या अहवालाबाबत एवढी गोपनीयता का बाळगली जात आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. नवले पुलावर अपघाताची मालिका सुरूच असून, गेल्या रविवारी येथे एका भरधाव ट्रकने 48 वाहनांना उडविले होते. यामध्ये अनेक जण गंभीर जखमी झाले होते. तसेच वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या अपघाताची तत्काळ दखल घेत मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर पोलीस, महापालिका, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. नवले पूल परिसरात महामार्गावर असलेल्या त्रुटी कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश त्यांनी दिले होते. दरम्यान, रविवारी झालेल्या अपघाताचे तांत्रिक विश्लेषण करून आरटीओकडून त्याचा अहवाल तयार केला जात होता. चार दिवसांनी अहवाल तयार करून आरटीओने पोलिसांना सादर केला आहे. पण, त्या अपघाताचे तांत्रिक विश्लेषण केल्यानंतर निष्कर्ष काय हे समजू शकलेले नाही. त्यामुळे आरटीओकडून हा अहवाल एवढा गोपनीय का ठेवला जात आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.