Pune : पत्रास कारण की.., पाणी बचत करा

पुणे : शहरात नागरिकांसह मोठ्या सोसायट्यांकडून पिण्याचा पाण्याचा अपव्यय केला जातो. त्यामुळे, पाणी बचतीसाठी महापालिकेकडून नागरिकांना विनंती केली जाणार आहे. राज्य शासनाकडून जल व्यवस्थापन पंधरावडा साजरा केला जाणार असून त्या अंतर्गत पालिकेकडून पाणी बचतीसाठीची जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे.
शहरात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका वाढल्याने पाण्याची मागणी १० ते १५ टक्के वाढली आहे. अशा स्थितीत, महापालिकेस धरणातून मिळणारे पाणी मर्यादीत असल्याने पाणी बचतीसाठी पालिकेकडून पत्र पाठवून जनजागृती केली जाणार आहे.
यावर देणार भर ….
शहरात अनेक जुन्या सोसायट्या तसेच इमारती आहेत, त्यांना पालिकेकडून सोसायटीच्या भुमीगत टाकीमध्ये पाणी दिले जाते. मात्र, या टाक्यांची सोसायट्या वर्षानुवर्षे दुरूस्ती करीत नाहीत परिणामी टाक्यांना मोठी गळती असते. यातून पाणी जमीनीत मुरते. तसेच, टाकी भरल्यानंतर पाणी ओव्हरफ्लो होऊन वाया जाते.
सोसायटी जुनी असल्यास घरांमधील नळांना मोठे लिकेज असते तसेच पिण्याचेच पाणी स्वच्छतागृहासाठी वापरले जाते. त्यामुळे, सोसायटीतील सर्व प्रकारची पाण्याची गळती रोखावी तसेच सोसायटीचे उद्यानासाठी पिण्याचे पाणी वापरू नये, असे विनंती पत्र महापालिकेकडून दिले जाणार आहे.
पिण्याच्या पाण्याचा मोठा अपव्यय होतो. त्यामुळे हे पाणी वाचविल्यास मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत होणार आहे. महापालिका त्यासाठी जादा पाणी वापरत असलेल्या सोसायट्यांना तसेच नागरिकांना नोटीस देते मात्र आता नागरिकांना पत्राद्वारे विनंतीही केली जाणार आहे.
– नंदकिशोर जगताप, पाणी पुरवठा विभाग प्रमुख, मनपा




