पुणे – शिक्षकांच्या प्रतिनियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू

शाळांना आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाची संलग्नता प्राप्त असणे अनिवार्य

पुणे – महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाची संलग्नता प्राप्त केलेल्या शाळांमध्ये जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची पाच वर्षांच्या प्रतिनियुक्तीवर नेमणुका करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासाठी 24 व 25 मे रोजी शिक्षकांना राज्यस्तरीय निवड परिषदेला सामोरे जावे लागणार आहे. यातून उत्तम शिक्षकांची निवड करण्यात येणार आहे.

राज्यातील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे उत्तम शिक्षण मिळावे यादृष्टीने शासनाकडून महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे. शैक्षणिक वर्ष 2018-19 व शैक्षणिक वर्ष 2019-20 पासून महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाची अस्थायी संलग्नता शाळांना देण्यात आलेली आहे. या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी शिक्षकांची निवड करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा परिषदांच्या प्राथमिक शाळांमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षकांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.

जिल्हा परिषद व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये काम करण्यासाठी दुर्दम्य इच्छाशक्ती असणारे, अध्यापनासाठी अधिक वेळ देऊ इच्छिणारे, निवड परिषदेस सामोरे जाण्याचे व उन्हाळी सुट्टीत 7 दिवसांचे निवासी प्रशिक्षण घेण्याची तयारी असणाऱ्या संबंधित जिल्ह्यातील जिल्हा परिषद व्यवस्थापनाच्याच शाळांमध्ये कार्यरत असणाऱ्या शिक्षकांकडूनच अर्ज मागविण्यात आले आहेत. यात एकूण 121 शिक्षकांच्या नियुक्‍त्या करण्यात येणार आहेत. यात अकोला जिल्ह्यासाठी 7, अहमदनगर व चंद्रपूरसाठी प्रत्येकी 1, उस्मानाबादकरिता 13, औरंगाबाद, कोल्हापूर व लातूरमध्ये प्रत्येकी 3, गोंदियामध्ये 2, नांदेड व परभणीसाठी प्रत्येकी 10, नाशिककरिता 11, पुणे जिल्ह्यासाठी 9, बुलढाणा व सांगलीमध्ये प्रत्येकी 14, रत्नागिरीसाठी 4, सातारामध्ये 16 शिक्षकांना नियुक्‍त्या देण्यात येणार आहेत.

ऑनलाइन दाखल झालेल्या अर्जांची छाननी करून शार्ट लिस्ट तयार करुन त्यातील शिक्षकांना राज्यस्तरीय निवड परिषदेसमोर उपस्थित राहण्याबाबत 21 मे रोजी वैयक्तिक ई-मेल व एसएमएस पाठविण्यात येणार आहेत. निवड परिषदेसाठी अर्ज केलेल्या शिक्षकांमधून 1 जागेसाठी 4 या प्रमाणात शिक्षकांना निवड परिषदेसाठी बोलाविण्यात येणार आहे. 28 मे रोजी निवड परिषदेचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. निवड करण्यात आलेल्या शिक्षकांचे निवासी प्रशिक्षण शिबिर 3 ते 9 जून या कालावधीत मुंबई येथे होणार आहे. निवड परिषदेमधून निवडण्यात आलेल्या शिक्षकांना कालांतराने संबंधित शाळेवर बदलीने नियुक्ती देण्यात येणार आहे.

निवड प्रक्रियेचे नियम जाहीर
निवड प्रक्रिया राबविण्यासाठी नियमही जाहीर करण्यात आलेले आहे. निवड परिषदेसाठी उपस्थित राहणाऱ्या शिक्षकांना सोबत मोबाइल फोन ठेवता येणार नाही. उपस्थित राहण्यासाठी प्रवास भत्ताही देण्यात येणार नाही. निवड परिषदेसाठी बोलाविण्यात आलेल्या शिक्षकांशिवाय इतर शिक्षक, नातेवाईक यांना प्रवेश दिला जाणार नाही, असे महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाकडून संकेतस्थळावर स्पष्ट करण्यात आले आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×