Pune : पुणे-दिल्ली प्रवासादरम्यान रंगणार मराठी साहित्ययात्री संमेलन

पुणे : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या दिल्ली येथे होत असलेल्या ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने सरहद संस्थेच्या वतीने पुणे ते दिल्ली रेल्वे प्रवासादरम्यान फिरत्या चाकांवर प्रवासी साहित्य संमेलन संकल्पनेतून मराठी साहित्ययात्री संमेलन आयोजित करण्यात येणार आहे. मुख्य संमेलनानिमित्त रेल्वेत होणारे हे मराठीतील पहिलेच आणि जगातील सर्वात मोठे आणि दिर्घ साहित्य संमेलन असणार आहे.
साहित्यरसिकांना पुण्यातून दिल्लीला घेऊन जाणाऱ्या रेल्वेला महान सेनानी महादजी शिंदे यांचे नाव देण्यात येणार असून प्रत्येक बोगीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गडकिल्ल्यांची नावे दिली जाणार आहेत. राज्याचे मराठी भाषामंत्री उदय सामंत या संमेलनाचे स्वागताध्यक्ष असून तेही मराठी साहित्ययात्री संमेलनात सहभागी होत रेल्वेतून प्रवास करणार आहेत.
साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखिका डॉ. संगीता बर्वे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती सरहदचे विश्वस्त डॉ. शैलेश पगारिया, अनुज नहार, महाराष्ट्र साहित्य परिदषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सरहदचे अध्यक्ष संजय नहार, शरद तांदळे, वैभव वाघ, शरद गोरे उपस्थित होते.
सामूहिक गीत, पुस्तक दिंडी….
महान सेनानी महादजी शिंदे यांचे नाव असलेल्या या विशेष रेल्वेला १६ बोगी असणार आहे. प्रवासारदम्यान प्रत्येक बोगीत विविध साहित्यिक-सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जाणार आहेत. युवा साहित्यिक व कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे या उद्देशाने मराठी साहित्ययात्री संमेलन भरविण्यात येत आहे. गर्जा महाराष्ट्र माझा, या महाराष्ट्र गीताच्या सामूहिक गायनानंतर पुण्यातून रेल्वे निघणार आहे. तत्पूर्वी पुस्तक दिंडीही काढली जाणार आहे. रेल्वे प्रवासात १२०० पेक्षा अधिक साहित्यिक येणार आहेत.
दि. २१ ते २३ फेब्रुवारी या कालावधीत दिल्लीतील छत्रपती शिवाजी महाराज साहित्यनगरी, ताल कटोरा स्टेडियम येथे हे संमेलन होत आहे. या संमेलनात सहभागी होणाऱ्या साहित्य रसिकांसाठी पुणे ते दिल्ली अशी विशेष रेल्वे सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही विशेष रेल्वे १९ फेब्रुवारीला दुपारी पुण्यातून निघणार असून २० फेब्रुवारी रोजी रात्री दिल्ली येथे पोहोचणार आहे.





