Pune : सरकारने सर्वांच्या आस्थेचा विचार करावा

पुणे : योग्य काय, अयोग्य काय हे इतिहासकार ठरवतील. औरंगजेबाची कबर हटवण्यासंदर्भात इतिहासकारांनी अभ्यास करून राज्याला मार्ग दाखवावा. खरा इतिहास समोर यायला हवा, असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. तसेच प्रत्येकाची आस्था वेगळी असते. सरकारने सर्वांच्या आस्थेचा आदर करावा, असेही त्या म्हणाल्या.
पक्षाच्या बैठकीपूर्वी सुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव, आणि सत्ता देणाऱ्या लाडक्या बहिणींचा सरकारला विसर पडला आहे. या ऐवजी वेगळेच विषय उकरून काढून त्यावर चर्चा केली जात आहे, असा आरोप त्यांनी केला. कृषी खात्यात बरबटलेल्या भ्रष्ट्राचाराबाबत भाजपचे आमदार सुरेस धस, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया, संदीप क्षीरसागर यांनीही वेळोवेळी भाष्य केले आहे.
याबाबत केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडेही चौकशी मागणी केली आहे. त्यांनीही चौकशीचे आश्वासन दिले आहे. दमानिया यांनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही केलेल्या टीकेसंदर्भात बोलताना, विरोधकांना टीका करण्याचा अधिकार आहे. पवारांवर गेल्या ५० वर्षांपासून विरोधक टीका करत आहेतच, असे सुळे म्हणाल्या.
पुरंदरबाबत माझ्याशी चर्चा नाही
पुरंदर विमानतळ व्हावे ही तेथील जनतेची इच्छा आहे. या इच्छेचा मान ठेवून सरकारने निर्णय घ्यावा. स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून मला या विमानतळाविषयी माहिती दिलेली नाही. विमानतळाबाबत सर्वांची सहकार्याची भूमिका असल्याने सरकारने सर्वांना विश्वासात घ्यावे, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
दैवताला अभिवादन
आमचे दैवत असलेले छत्रपती शिवाजी रयतेचे राजे होते. ‘जय शिवराय’ ही समतेची भाषा आहे. ‘जय शिवराय’ म्हणण्यात काय समस्या आहे, त्यामुळेच ‘हॅलो’ ऐवजी ‘जय शिवराय’ म्हणण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
खा. सुप्रिया सुळे म्हणाल्या.
– बीडमधील परिस्थिती पूर्वीपेक्षा सुधारली. त्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे आभार.
– साखर आणि कृषी समस्यांबाबत अमित शहांना भेटणार
– पाऊस चांगला होऊनही पाण्याचे नियोजन न जमणे हे सरकारचे अपयश
– सर्वाधिक खंडणीखोर कुठल्या पक्षात हे सर्वांनाच ठाऊक आहे.




