पुणे – विद्यापीठ चौकातील दुमजली उड्डाण पुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्या (बुधवार, दि. २०) होत आहे. येथील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी याचा मोठा फायदा हणार आहे. औंध- शिवाजीनगर पूल खुला झाल्यावर या भागातील नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार असल्याची माहिती पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी दिली. विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी कमी व्हावी, दीर्घकालीन वाहतूक व्यवस्थापन व्हावे, यासाठी या एकात्मिक दुमजली उड्डाण पुलाची उभारणी केली आहे. यासाठी सुमारे २७७ कोटीच्या अंदाजपत्रकास मान्यता मिळाली. वाहतुकीस पुरेसा रस्ता असावा, यासाठी पुणे विद्यापीठ ते कृषी महाविद्यालय हा रस्ता पुणे मनपा विकास आराखड्यानुसार ४५ मीटरपर्यंत रुंद केला आहे. शिवाजीनगर- औंध बाजूच्या रॅम्पचे बांधकाम पूर्ण झाले असून, उर्वरित बाणेर, पाषाण रॅम्पचे बांधकाम ऑक्टोबर २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे डॉ. म्हसे यांनी सांगितले. माण- हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो या २३ किमी उन्नत मेट्रोचे बांधकाम प्रगतिपथावर असून, आजपर्यंत ८८. ५१ टक्के काम पूर्ण झाले आहे. मेट्रो स्थानक क्र. १९ चे बांधकाम विद्यापीठ चौक येथे प्रगतिपथावर असून, मेट्रो स्थानक, औंध, बाणेर आणि पाषाण या तिन्ही रस्त्यांना जोडण्यासाठी मेट्रो जिना प्रस्तावित आहे. आमदार सिद्धार्थ शिरोळे म्हणाले, की पुणे विद्यापीठ चौकातील राजभवन ते आरबीआय या उड्डाण पुलाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे. या उड्डाण पुलाने विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल.