Pune : नागझरी नाल्यावरील कल्वर्ट होणार रूंद

पुणे – शहराच्या मध्यवर्ती व्यापारी पेठांमधून वाहणाऱ्या नागझरी नाल्यावर सुमारे ४० ते ५० वर्षे जुने कल्वर्ट आहेत. या कल्वर्टचा आकारही छोटा असून, पाणी जाण्यासाठी असणाऱ्या जलवाहिन्या (पाईप) छोटे आहेत. त्यामुळे या जलवाहिन्यांमध्ये कचरा अडकल्याने मोठया प्रमाणात पाऊस झाल्यास या कल्वर्टमधून पाणी बाहेर येवून आसपासची लोकवस्ती, तसेच दुकानांमध्ये घुसते. त्यामुळे, ही पूरस्थिती रोखण्यासाठी महापालिकेकडून नागझरी नाल्यासह, गेल्या दोन ते तीन वर्षात पूर उद्भवलेल्या सात कल्वर्टचे काम नव्याने केले जाणार आहे.
या कामासाठी तब्बल १६ कोटींचा खर्च अपेक्षीत असून, त्याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाकडून स्थायी समितीत ठेवण्यात आला आहे. १५ व्या वित्त आयोगा अंतर्गत राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाअंतर्गत महापालिकेस शहरी पूर व्यवस्थापनासाठी निधी देण्यात आला आहे. या निधीतून नागझरी नाल्यासह, शहरात इतर पाच ठिकाणच्या कल्वर्टही रूंद केले जाणार आहेत.
४० ते ५० वर्षे जुने कल्वर्ट
नागझरी नाला शहराच्या मध्यवर्ती भागातून जातो. त्यामुळे, या भागात जसजशी लोकवस्ती वाढली, तसे हा नाला अतिक्रमणांमुळे छोटा झाला. त्यामुळे काही ठिकाणी या पूर्वीच महापालिकेने रस्ते तयार करताना तत्कालीन स्थिती नुसार पाईप टाकले आहेत. मात्र, आता नाल्याच्या कडेला मोठया प्रमाणात लोकवस्ती झाल्याने नाल्यात येणारे पाणी वाढले आहे.
त्यातच, गेल्या काही वर्षात शहरात अचानक मोठया प्रमाणात अतिवृष्टीसदृश पाऊस होत असल्याने नाल्यांचे पाणी लोकवस्तीत, तसेच भवानी पेठ परिसरातील टिंबर मार्केट आणि इतर व्यावसायिक दुकानांमध्येही घुसत आहे. त्यामुळे, नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याने महापालिकेने या ठिकाणच्या कल्वर्ट वाढविण्याचे काम हाती घेतले आहे. त्यानुसार पाणी वाहून नेण्याचे पाईप, कल्वर्टचा आकार . त्याची उंची वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे कल्वर्टची पाणी वाहून नेण्याची क्षमता वाढल्यास पूर स्थिती उद्भवणार नाही.
या ठिकाणी होणार कामे
– विठ्ठल मंदीर, वानवडी
– संस्कृती स्कूल, उंड्री
– पंडीत नेहरू रस्ता, भवानी पेठ (२ ठिकाणी)
– आॅक्सिजन पार्क – वडगाव शेरी
– वाघजाई मंदीर -कोंढवा
– पाच पांडव सोसायटी – शिवाजीनगर





