pune : देशाचा खरा विकासदर केवळ २.७ टक्केच
Pune:

माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा; केंद्र शासनाकडून आर्थिक आकडेवारीत दिशाभूल
पुणे – सद्यस्थितीत केंद्र शासनाकडून जनतेसमोर सादर केली जाणारी आकडेवारी दिशाभूल करणारी असून, देशाचा वास्तविक विकासदर ७.७ टक्के नसून, केवळ २.७ टक्क्यांच्या आसपास आहे, अशी टीका माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी केंद्र शासनावर केली. देशाची खरी आर्थिक आकडेवारी समोर आल्याशिवाय अर्थव्यवस्थेचे योग्य विश्लेषण आणि अचूक धोरणनिर्मिती करणे शक्य नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने नवी पेठेतील पत्रकार भवन येथे आयोजित आजची भारतीय अर्थव्यवस्था या विषयावरील विशेष चर्चासत्रात सिन्हा बोलत होते. माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण अध्यक्षस्थानी होते.
या वेळी काँग्रेसचे पश्चिम विभाग शहराध्यक्ष दीप्ती चवधरी, पूर्व विभाग शहराध्यक्ष प्रशांत जगताप, नीलिमा सिन्हा, माजी आमदार मोहन जोशी, महापालिकेचे गटनेते चंदूशेठ कदम, प्रवक्ते गोपाळ तिवारी, सुनील शिंदे, दीपाली डोख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
नोव्हेंबर २०२५ मध्ये जागतिक नाणेनिधीने भारताच्या आर्थिक आकडेवारी गोळा करण्याच्या पद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करत भारताला सी ग्रेड दिली आहे. देशासाठी हीअत्यंत लज्जास्पद बाब आहे. वास्तविक परिस्थिती आणि सरकारी आकडेवारीमध्ये तब्बल ४ ते ५ टक्क्यांची मोठी तफावत आहे.
मूळ आकडेवारीच चुकीची असेल, तर देशाची धोरणे कधीही योग्य प्रकारे तयार होऊ शकत नाहीत. त्यांची अंमलबजावणीही कोलमडते. हे सरकार कामाऐवजी केवळ प्रसिद्धी आणि प्रचारावर चालत असून, जनतेला खरी माहिती मिळणार नाही, याची काळजी घेत असल्याचा टोलाही सिन्हा यांनी लगावला.
नोटबंदीचा एकही उद्देश सफल झाला नसून, बाजारातील ९९.९९ टक्के चलन बँकांमध्ये परत आले. काळ्या पैशांची एकही केस दाखल झाली नाही. काही मोजक्या मित्रांसाठी काळा पैसा कायदेशीर करण्यात आला. गेल्या दोन वर्षांत देशात परकीय गुंतवणूक आली नसून, उलट भारतीय नागरिकच सुरक्षित भवितव्यासाठी परदेशात गुंतवणूक करत आहेत, असेही त्यांनी सांगितले आहे.





