Pune : अतिरिक्त आयुक्तांनी घेतली शिक्षकांची शाळा

येरवडा : पायथागोरसचे प्रमेय काय ? ते विद्यार्थ्यांना फळ्यावर सोडवून दाखवा, विद्यार्थ्यांना वाचायला कितपत येते, शाळेचा परीसर स्वच्छ आहे की नाही, विद्यार्थ्यांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळते की नाही, फिल्टर पाण्याची सोय आहे की नाही. शाळेची सीमाभिंतीला खड्डा पडला आहे. यातून बाहेरची माणसे ये-जा करीत आहेत तर ती दुरुस्त का केली जात नाही. क्रीडानिकेतन शाळा आहे, मग मैदान कुठे आहे. याची विचारणा करीत अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी. यांनी शिक्षकांचीच शाळा घेतली.
कै.अनुसया सावंत व वि.दा.घाटे शाळेतील विद्यार्थी, शिक्षकांसह शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांकडून आयुक्तांनी संपूर्ण माहिती घेतली. शाळांना मूलभूत सुविधा पुरवा याबाबत सूचना केल्या. यावेळी आमदार बापुसाहेब पठारे, प्राथमिक शिक्षण विभागाच्या उपायुक्त आशा राऊत, येरवडा क्षेत्रीय कार्यालयाच्या वंदना साळवे, चंद्रसेन नागटिळक, शुभांगी चव्हाण, उपप्रशासकीय अधिकारी, जयेश शेंडकर सहायक प्रशासकीय अधिकारी आदि उपस्थित होते.
येरवडा विभागातील पालिकेच्या अनेक शाळा असून त्यांची सद्यस्थिती कशी आहे याची पाहणी शिक्षण विभागाच्या अधिकााऱ्यांसमवेत अतिरिक्त आयुक्तांनी केली. यावेळी अनेक शाळांना वर्ग खोल्या कमी असल्याची तक्रार शिक्षकांनी केली. तसेच वि.दा. घाटे शाळेत पाण्याची टाकी नादुरुस्त असल्याने ती दुरुस्त करण्याची सूचना अतिरिक्त आयुक्तांनी केली. तसेच शाळेत अनेक कंपन्या सीएसाअर फंड देत असतात. या माध्यमातून रंगरंगोटी करण्याची सूचना केली.
महापालिकेच्या शाळामध्ये निधी अभावी मूलभूत सुविधांचा अभाव असतो. मोठ्या कामांसाठी भवन विभागाकडून तरतूद केली जाते. मात्र, लहान कामे क्षेत्रीय कार्यालय स्तरावर केली जातात. परंतु, निधी नसल्याने क्षेत्रीय कार्यालयाना कामे करताना अडचणी येतात. यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या शाळांची कामे करण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांनाच एक कोटी निधी देण्याचा प्रस्ताव देण्यात आला असल्याची तसेच याबाबत अतिरीक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी. यांनीही चर्चा केली असल्याची माहिती प्राथमिक शिक्षण विभागाच्या उपायुक्त आशा राऊत यांनी दिली. या निधीतून शाळांची कामे लवकर केली जातील, यासाठी शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षण विभागाचे सहायक अधिकारी आणि क्षेत्रीय कार्यालयाचे अभियंते यांचा समन्वय असणार आहे, असेही राऊत यांनी सांगितले.





