PUNE : येरवड्यातील कारवाई ठरली फुसका बार

येरवडा – येरवडा गाडीतळ, सौ. शीला साळवे भाजी मार्केट, लक्ष्मीनगर येथील अतिक्रमण हटविण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयाने 2 अतिक्रमण निरीक्षक, 6 सहायक निरीक्षक, 10 कायम बिगारी सेवक, 21 कंत्राटी बिगारी, 9 सुरक्षा रक्षक. 4 पोलीस कर्मचारी, 2 वायरमन, 7 वाहन, जेसीबी, गॅस कटर असा फौज फाटा तैनात केला होता. परंतु, अगदीच किरकोळ दुकाने आणि हातगाड्यांवर कारवाई केली तर मूळ अतिक्रमणे तशीच राहिल्याने ही कारवाई फुसका बार ठरली.
येरवडा गाडीतळ ते भाजी मार्केट येथे रस्त्यावर अतिक्रमण वाढल्याने वाहतूक कोंडीचा त्रास होत होता. या रस्त्यावरून नागरिकांना चालण्यासाठीही रस्ता शिल्लक नव्हता. यामुळे, सदर अतिक्रमण हटवावीत, अशी मागणी नागरिकांकडून होत होती. यानुसार मंगळवारी (दि.10) सकाळी 11:00 वाजता मोठा फौज फाटा कारवाईसाठी आला.
आता, मोठी कारवाई होणार असे चित्र असतानाच कवेळ 8 पत्रे, 5 हातगाडी, 1 सिलेंडर आणि काही प्लॅस्टिक कागद हटवून कर्मचारी फौज फाट्यासह निघुन गेले. मूळ अतिक्रमण तसेच राहिले, किरकोळ कारवाई करायची होती. तर, क्षेत्रीय कार्यालयाचे एवढा दिखावा कशासाठी केला? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.
अतिक्रमण निर्मूलन विभाग आणि आकाशचिन्ह विभाग आणि गलिच्छ वस्ती निर्मूलन (गवनि) विभाग अशी संयुक्तपणे ही कारवाई करण्यात येणार होती. परंतु, मंडई विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित नसल्याने भाजी विक्रेत्यांवर करवाई केलेली नाही. – धनंजय नेवसे, अतिक्रमण निरीक्षक, क्षेत्रिय कार्यालय, येरवडा





