पुणे – वाघोली येथे डंपरच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या तरुणीचा रविवारी (दि. ३) मृत्यू झाला. १० ऑक्टोबरला सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास वाघोलीत पुणे-नगर महामार्ग ओलांडत असताना झालेल्या अपघातात मनीषा बाळासाहेब मंडलिक (वय २३, रा. वाघोली) गंभीर जखमी झाली होती. तिच्यावर २३ दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरू होते. तिच्या मृत्यूनंतर डंपर चालकावर गुन्ह्याचे कलम वाढविण्यात आले असल्याचे वाघोली पोलिसांनी सांगितले.
अपघात झाला त्यावेळी तेथून जाणारे आमदार अशोक पवार जात होते. त्यांनी तत्काळ तिला रुग्णालयात दाखल करून नंतर पुण्यातील खासगी रुग्णालयात तिची उपचाराची सोय केली होती. तिचे दोन्ही पाय डंपर खाली आल्याने ती गंभीर जखमी झाली होती. २३ दिवसांची तिची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली.
मनीषा ही खासगी संस्थेत नोकरीला होती. तसेच, कुटुंबासाठी आधार होती. डंपर चालक अनिल शंकर तुरुकमारे (वय ३८, रा. तितिक्षा पार्क, आळंदी फाटा, लोणीकंद) याच्यावर दुसऱ्या दिवशी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तिच्या मृत्यूनंतर चालकावर गुन्ह्याचे कलम वाढविण्यात आले असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित रेजितवाड यांनी सांगितले.