पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा (टीईटी) अंतरिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. यात एकुण १० हजार ८९० उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेच्या निकालाच्या अनुषंगाने गुणपडताळणी, आक्षेप नोंदवण्यासाठीचा अर्ज करण्यासाठी दि. ६ फेब्रुवारी पर्यंत मुदत देण्यात आली आहे. परीक्षा परिषदेतर्फे १० नोव्हेंबर रोजी राज्यभरात टीईटी परीक्षा घेण्यात आली. त्यात पहिली ते पाचवीसाठीसाठी पेपर एक आणि सहावी ते आठवीसाठी पेपर दोनचा समावेश होता. या परीक्षेचा अंतरिम निकाल http://www.mscepune.in/ या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. निकालाच्या अनुषंगाने गुणपडताळणी, आक्षेप नोंदवण्यासाठी ऑनलाइन अर्ज करायचा आहे. अन्य मार्गाने केलेल्या अर्जांचा विचार करण्यात येणार नाही. निकाल राखीव ठेवलेल्या उमेदवारांना त्यांचे निवेदन सादर करण्यासाठी दि. ६ फेब्रुवारीपर्यंतची मुदत देण्यात आल्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदे परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी स्पष्ट केले आहे. टीईटी परीक्षेसाठी एकुण ३ लाख ५३ हजार ९५२ उमेदवारांची नोंदणी झाली होती. त्यात पेपर एक साठी १ लाख ५२ हजार ६०५ तर पेपर दोनसाठी २ लाख १ हजार ३४७ उमेदवारांचा समावेश होता. यात परीक्षेसाठी एकुण ३ लाख ३० हजार ७४ उमेदवारांचा समावेश होता. पेपर एकच्या परीक्षेसाठी १ लाख ४२ हजार २५४ तर पेपर दोन साठी १ लाख ८७ हजार ८२० उमेदवार परीक्षेला बसले होते. परीक्षेत एकुण १० हजार ८९० उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. यात पेपर एकमध्ये ४ हजार ६८४ तर पेपर दोन मध्ये ६ हजार २०६ उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. पेपर एकचा निकाल ३.२९ टक्के तर पेपर दोनचा निकाल ३.३० टक्के एवढा लागला आहे.