Pune : एकाचवेळी शहरातून दहा सराईत तडीपार

पुणे : शहरातील लोणी काळभोर, कोंढवा, मुंढवा, बिबवेवाडी तसेच हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील म्हणजेच परिमंडळ पाचमधील एकूण दहा सराईत गुन्हेगारांना एकाचवेळी शहरातून तडीपार करण्यात आले आहे.
परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी तडीपारीचे आदेश दिले आहेत. फिरोज महंमद शेख (२९, रा. कदमवाकवस्ती), प्रसाद दत्तात्रय जेठीथोर (२०, रा. लोणी काळभोर), चंद्रशेखर उर्फ चंद्रकांत दाजी चोरमले (२३, रा. लोणी काळभोर), अजय दीपक जाधव (३५, रा. मुंढवा), हनुमंत दगडू सरोदे (४८, रा. मुंढवा), साहील राजू साठे (१९, रा. मुंढवा), वसीम सलीम पटेल (४०, रा. कोंढवा), वसीम शकील खान (२५, रा. कोंढवा), ओंकार शिवानंद स्वामी (२३, रा. बिबवेवाडी), आदीराज मनोज कामठे (२१, रा. हडपसर) अशी तडीपार करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तडीपार करण्यात आलेल्या आरोपींवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे आहेत.
गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी तसेच गुन्हेगारीला प्रतिबंध करण्यासाठी पोलीस प्रयत्न करीत आहेत. सराईतांच्या हालचालींवर लक्ष ठेवून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली जात आहे. यादरम्यान, परिमंडळ पाचमधील लोणी काळभोर, मुंढवा, कोंढवा, बिबवेवाडी आणि हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगारांवर कारवाईचा प्रस्ताव उपायुक्तांकडे पाठविण्यात आला होता.
प्रस्तावाची छाननी करून उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी एकाचवेळी दहा आरोपींवर तडीपारीची कारवाई केली. दहाही आरोपी रेकॉर्डवरील असून त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. यंदाच्या वर्षात म्हणजेच मागील काही महिन्यात परिमंडळ पाचमधून सुमारे पंधरा सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यात आलेले आहे.




